फोटो सौजन्य - Social Media
देशभक्तीची भावना असणाऱ्या तरुण-तरुणींसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय टेरिटोरियल आर्मीने अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर केली आहे. या भरतीद्वारे युवकांना देशसेवेची संधी मिळणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज प्रक्रिया १२ मे २०२५ पासून सुरू होणार असून, १० जून २०२५ ही शेवटची तारीख आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाइट territorialarmy.in वर जाऊन अर्ज करावा लागेल. या भरतीमध्ये एकूण १९ पदे उपलब्ध असून त्यापैकी १८ पुरुषांसाठी तर १ पद महिलांसाठी राखीव आहे. अर्ज करण्यासाठी ५०० रुपये शुल्क भरावे लागणार असून ते ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाईल. शैक्षणिक पात्रतेच्या दृष्टीने उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा १८ ते ४२ वर्षे निश्चित करण्यात आली असून, अर्ज करणाऱ्याचे वय १० जून २०२५ रोजी ४२ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
या पदांसाठी उमेदवारांचा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणे अनिवार्य आहे. भरती प्रक्रियेमध्ये ऑनलाइन परीक्षा, SSB मुलाखत, कागदपत्र तपासणी आणि वैद्यकीय चाचणी अशा टप्प्यांचा समावेश आहे.
ऑनलाइन प्रवेश परीक्षा २० जुलै २०२५ रोजी होणार आहे. ही परीक्षा देशभरातील विविध केंद्रांवर घेतली जाणार असून, त्यासाठी उमेदवारांनी वेळेत योग्य तयारी करणे गरजेचे आहे. या परीक्षेनंतर उमेदवारांना SSB मुलाखतीसाठी बोलावले जाईल, त्यानंतर कागदपत्र तपासणी आणि वैद्यकीय चाचणी होईल. विशेष बाब म्हणजे, ज्या उमेदवारांनी सध्या केंद्र सरकार, राज्य सरकार, अर्ध-सरकारी संस्था, सार्वजनिक उपक्रम (PSUs), नियमित सैन्यदल, नौसेना, वायुदल, पोलीस दल, GREF, निमलष्करी दल किंवा कोणत्याही प्रकारच्या नोकरीत सेवा बजावत आहेत, अशांना या भरतीसाठी पात्र मानले जाणार नाही.
टेरिटोरियल आर्मीमध्ये अधिकारी होणे ही केवळ नोकरी नसून, ती एक सेवा, सन्मान आणि शिस्तीचे प्रतीक आहे. हे स्थान मिळवण्यासाठी उमेदवारांकडे देशभक्तीची भावना, सेवाभाव आणि जबाबदारीची जाणीव असणे आवश्यक आहे. यामुळेच ही संधी केवळ पात्र आणि प्रेरित उमेदवारांसाठीच खुली आहे. इच्छुकांनी लवकरात लवकर अधिकृत वेबसाइटवर जाऊन संपूर्ण माहिती वाचावी, आवश्यक त्या कागदपत्रांची तयारी ठेवावी आणि वेळेत अर्ज सादर करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.