फोटो सौजन्य - Social Media
खरंच प्रेरणादायी वाटणारी ही गोष्ट आहे फराह हुसेन यांची, ज्या यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून आयएएस अधिकारी बनल्या. ही परीक्षा भारतातील सर्वांत कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. लाखो विद्यार्थी दरवर्षी या परीक्षेला बसतात, मात्र काहीच विद्यार्थी अंतिम यश संपादन करतात. फराह हुसैन यांनी आपल्या जिद्द, मेहनत आणि कौटुंबिक प्रेरणेच्या जोरावर हे यश मिळवलं आहे. फराह हुसैन यांचा जन्म राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील नवान गावात एका मुस्लिम कुटुंबात झाला. त्यांचं कुटुंब हे सार्वजनिक सेवेशी जोडलेलं आहे. त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य आधीपासूनच वरिष्ठ सरकारी पदांवर कार्यरत आहेत. फराह यांचं शिक्षण झुंझुनूमध्ये झालं आणि त्यानंतर त्या मुंबईला गेल्या जिथं त्यांनी गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून कायद्याचं शिक्षण घेतलं.
सुरुवातीला फराह डॉक्टर व्हायचं स्वप्न पाहत होत्या, पण नंतर त्यांनी गुन्हेगारी वकिली केली आणि पुढे यूपीएससीकडे वळाल्या. 2016 मध्ये दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केली आणि 267वी अखिल भारतीय रँक मिळवली. त्या वयाच्या 26व्या वर्षी आयएएस अधिकारी झाल्या.
फराह यांचं कुटुंब हे खऱ्या अर्थानं प्रेरणादायी आहे. त्यांचे वडील अशफाक हुसेन हे जिल्हाधिकारी होते आणि 2016 मध्ये आयएएस झाले. त्यांचे चुलते लियाकत खान हे वरिष्ठ आयपीएस अधिकारी होते आणि आयजी पदावरून निवृत्त झाले. दुसरे चुलते जाकीर खान देखील आयएएस अधिकारी आहेत. फराह यांची मोठी बहीण राजस्थान उच्च न्यायालयात वकील आहे. त्यांचे चुलत भाऊ, बहिणी आणि सासरचे नातेवाईक आरएएस, आयपीएस, आयआरएस अधिकारी तसेच भारतीय सैन्यात कार्यरत आहेत.
त्यांचे चुलत बंधू शाहीन खान हे वरिष्ठ आरएएस अधिकारी आहेत, आणि त्यांच्या पत्नी मोनिका या सध्या जयपूरच्या जेलमध्ये डीआयजी आहेत. ब्रिगेडियर शाकिब खान आणि कर्नल इशरत खान हे भारतीय सैन्यात अधिकारी आहेत. फराह यांचे पती कमर उल जमान चौधरी हे जम्मू-काश्मीरचे आयएएस अधिकारी असून सध्या जोधपूरमध्ये कार्यरत आहेत. फराह हुसैन यांचा प्रवास हे एक उत्तम उदाहरण आहे की योग्य दिशेने परिश्रम घेतले तर कोणतंही स्वप्न पूर्ण करता येऊ शकतं.