फोटो सौजन्य - Social Media
सफीन हसन हे नाव आज लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. गरिबीला न जुमानता वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी UPSC परीक्षा उत्तीर्ण करून देशातील सर्वात तरुण IPS अधिकारी होण्याचा मान त्यांनी मिळवला. त्यांची कहाणी सांगते की जिद्द, मेहनत आणि उद्दिष्टाप्रती निष्ठा असेल तर कोणतीही शिखरं गाठता येतात. सफीन हसन यांचा जन्म १९९५ मध्ये गुजरातमधील पालनपूर या गावातील एका मजूर कुटुंबात झाला. त्यांचे आई-वडील हिरे उद्योगात काम करत होते, मात्र २००० साली त्यांची नोकरी गेली. त्यानंतर आईने लोकांच्या घरात स्वयंपाक करणे आणि लग्नसमारंभात पोळ्या लाटणे सुरू केले, तर वडील वीजकाम आणि विटा उचलण्याचे काम करू लागले. संध्याकाळी दोघे मिळून उकडलेली अंडी विकत. अशा परिस्थितीतही मुलाच्या शिक्षणावर त्यांनी तडजोड केली नाही.
लहानपणी एकदा शाळेतून घरी जाताना सफीन यांनी कलेक्टरचा ताफा पाहिला आणि त्याच क्षणी ठरवलं की आपणही एक दिवस अधिकारी व्हायचं. मात्र ही वाट सोपी नव्हती. शाळेची फी भरणं, पुस्तकं खरेदी करणं आणि शिक्षण सुरू ठेवणं यासाठी त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं.
इंजिनियरिंगचं शिक्षण घेत असतानाच त्यांनी UPSCची तयारी सुरू केली. महागडी कोचिंग, मोठ्या शहरातील सोयी-सुविधा काहीही नव्हतं, फक्त काही पुस्तकं, इंटरनेट आणि स्वतःची अभ्यास पद्धती यांच्या जोरावर त्यांनी तयारी चालू ठेवली. रोज १०–१२ तास अभ्यास, मॉक टेस्ट यामुळे त्यांची तयारी भक्कम झाली.
पहिल्याच प्रयत्नात UPSCच्या मुख्य परीक्षेपूर्वी त्यांचा गंभीर अपघात झाला. पण हार न मानता ते व्हीलचेअरवर परीक्षा देण्यासाठी गेले. मुलाखतीपूर्वी ते आजारी पडले तरीही मागे हटले नाहीत. त्यांच्या मेहनत आणि आत्मविश्वासाचं फलित म्हणजे २०१७ च्या UPSC परीक्षेत मिळवलेली ५७० वी रँक. यश मिळाल्यानंतर सफीन हसन यांची गुजरात कॅडरमध्ये IPS म्हणून नियुक्ती झाली. प्रशिक्षणानंतर त्यांनी अनेक जिल्ह्यांमध्ये सेवा बजावली आहे. सोशल मीडियावरही ते सक्रिय आहेत आणि त्यांच्या इंस्टाग्रामवर ८ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. सफीन हसन यांची कहाणी सिद्ध करते की अडचणी या अडथळे नसतात, तर त्या यशाच्या पायऱ्या असतात. फक्त गरज असते ती ठाम निर्धाराची आणि अखंड मेहनतीची.