फोटो सौजन्य- प्रतिनिधी
सध्या विद्यार्थ्यांनी करिअरसाठी केवळ नोकरी हा पर्याय डोळ्यासमोर न ठेवता स्वत: चा उद्योग निर्माण करुन अनेकांना रोजगार निर्मिती करावी यासाठी प्रयत्न केले जात आहे. कल्याणमधील बी.के. बिर्ला महाविद्यालयाकडूनही विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता विकसित होण्यासाठी उद्योजगतेशी निगडीत अनेक उपक्रम केले जात असतात. त्यामधील स्टार्टअप मेला हा विशेष कार्यक्रम बिर्ला रात्र महाविद्यालयाच्या उद्योजकता सेल अंतर्गत नुकताच आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील अनेक स्टॉल्स लावण्यात आले होते, जिथे विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडत्या उत्पादनांचे प्रदर्शन केले. या कार्यक्रमाचे आयोजन बी.के. बिर्ला रात्र महाविद्यालयाचे संचालक डॉ. नरेश चंद्र आणि प्राचार्य डॉ. बिपीनचंद्र वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. त्यांनी स्टॉल्सना भेट देऊन स्टॉलधारकांना उत्साह व प्रेरणा दिली, ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पकतेला वाव मिळाला.
विद्यार्थ्यांना स्वत:चा व्यवसाय स्थापन करण्याचा मिळाला अनुभव
उद्योजकता सेलचे प्रभारी डॉ. रुपेश पाटील आणि सर्व शिक्षक यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. समन्वयक म्हणून धरणी मुडलियार व दर्शन दुबे, तसेच सोशल मीडिया समन्वयक अथर्व जाधव व लक्ष्मी सिंह यांनी कार्यरत राहून कार्यक्रमाचे व्यवस्थापन उत्कृष्टपणे केले. या स्टार्टअप मेळ्याचा मुख्य उद्देश सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ प्रदान करणे हा आहे, ज्याद्वारे त्यांना त्यांच्या कौशल्यांचा प्रदर्शन करण्याची संधी मिळेल. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या व्यवसायाची स्थापना करण्यासाठी आवश्यक साधनांची माहिती आणि अनुभव मिळू शकेल, ज्यामुळे भविष्यात ते यशस्वीपणे उद्योजक म्हणून कार्यरत राहू शकतील. ते रोजगारनिर्मिती करणारे होऊ शकतील.
स्टॉलवरील उत्पादनांची विक्री आणि अनेक ऑर्डरही मिळाल्या
या कार्यक्रमात तब्बल 2000 हून अधिक विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी स्टॉल्सना भेट दिली. कार्यक्रमातील विद्यार्थ्यांच्या स्टॉलवरील सर्व उत्पादने विकली गेली असून, विशेष म्हणजे स्टॉलधारकांना अनेक ऑर्डरही प्राप्त झाल्या आहेत. यामुळे स्टॉलधारकांनाच्या उत्पादनांना मिळणार प्रतिसाद हा अतिशय उत्तम होता. बी .के. बिर्ला रात्र महाविद्यालयाने त्यांना एक व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून महाविद्यालयापासूनच विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिकतेबद्दल ओढ निर्माण होईल आणि ते आपले करिअर उज्ज्वल बनवण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यास सक्षम होतील.