
फोटो सौजन्य - Social Media
राज्यातील अभियांत्रिकी (National Engineers Day) प्रवेश प्रक्रियेत यंदा मोठा बदल झाला आहे. काही वर्षांपूर्वी अभियांत्रिकी क्षेत्राला सुवर्णकाळ लाभला होता, मात्र आता परिस्थिती उलटताना दिसत आहे. यंदा ८५ ते १०० पर्सेंटाइल मिळवलेल्या तब्बल २ हजार ९७२ विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेत भाग घेतला नाही, हे चिंताजनक चित्र राज्याच्या शिक्षणव्यवस्थेसमोर उभे राहिले आहे. आधी कुणी विद्यार्थ्यांना विचारले की मोठे होऊन काय होणार? तर सगळेच विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी क्षेत्रात एक विशेष रस होता. पण हा कल आता अभियांत्रिकी क्षेत्राकडून वळताना दिसत आहे.
सीईटी परीक्षेत ९५ ते १०० पर्सेंटाइल गटातील १,३२२ विद्यार्थ्यांनी कॅप फेरीत प्रवेश घेतला नाही, तर ८५ ते ९५ पर्सेंटाइल गटातील २,६६१ विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेतून बाहेर राहिले. या विद्यार्थ्यांपैकी अनेकांनी आयटीआय, पॉलिटेक्निक, डिजिटल टेक्नॉलॉजी आणि इतर व्यावहारिक कोर्सेसचा मार्ग स्वीकारला आहे.
राज्यातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी दरवर्षी तीव्र चुरस असते. राष्ट्रीय पातळीवरील जेईई मेन आणि अॅडव्हान्स्ड परीक्षांद्वारे आयआयटी, एनआयटीसारख्या संस्थांत प्रवेश दिला जातो, तर राज्य पातळीवर सीईटीद्वारे अभियांत्रिकी कॉलेजांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. या वर्षी १५९ विद्यार्थ्यांनी अ-कॅप फेरीत, तर ६७ विद्यार्थ्यांनी संस्थात्मक फेरीत प्रवेश घेतला. ८५ ते ९५ पर्सेंटाइल गटातील ४६४ जणांनी अ-कॅप, तर ३२६ जणांनी संस्थात्मक फेरीत प्रवेश निश्चित केला आहे.
शिक्षणतज्ज्ञांच्या मते, बदलती औद्योगिक गरज, वाढता शिक्षणखर्च आणि तात्काळ रोजगाराच्या संधी यामुळे विद्यार्थी अभियांत्रिकीपेक्षा स्किल-बेस्ड शिक्षणाकडे वळत आहेत. हाताला काम, कमी कालावधीचा अभ्यासक्रम आणि स्थिर उत्पन्नाची खात्री देणारे आयटीआय कोर्स तरुणांना अधिक आकर्षक वाटत आहेत. परिणामी, अभियांत्रिकीपेक्षा व्यावहारिक शिक्षणाचा कल राज्यात झपाट्याने वाढताना दिसतो आहे.