फोटो सौजन्य - Social Media
ही कथा आहे आयपीएस अंशिका जैन यांच्या अदम्य जिद्दीची, ज्यांनी आयुष्याच्या सर्वात कठीण प्रसंगांमध्येही आशा आणि आत्मविश्वास जिवंत ठेवला. वयाच्या फक्त पाचव्या वर्षी आई-वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यातील खंबीर आधार बनल्या त्या त्यांच्या आजी. आजीच्या प्रेम, काळजी आणि प्रेरणेच्या बळावर अंशिकाने आयुष्यात पुढे जाण्याचं धैर्य दाखवलं आणि सरकारी अधिकारी बनण्याचं स्वप्न मनाशी पक्कं केलं. जिद्द म्हणजे काय? एखादी गोष्ट मिळवण्यासाठी कशा प्रकारे तयारी करावी? या सगळ्या गोष्टींचे उत्तम उध्दरण म्हणजे अंशिका जैन.
दिल्लीमध्ये जन्मलेल्या अंशिकाने दिल्ली विद्यापीठातील रामजस कॉलेजमधून बी.कॉम आणि एम.कॉम पदवी प्राप्त केली. शिक्षण घेत असतानाच त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. मात्र हा प्रवास अत्यंत आव्हानात्मक होता. सलग चार वेळा अपयश आलं, तरीही त्यांनी हार मानली नाही. वर्ष २०१९ मध्ये आजीचं निधन झालं, ज्यामुळे त्या मानसिकदृष्ट्या खूप खचल्या, पण त्यांनी त्या वेदनेलाच आपल्या जिद्दीचं बळ बनवलं. आजीचे स्वप्न होतं. आजी नसली तरी काय झालं तिचे आशीर्वाद तिच्या नेहमी सोबत होते. तिच्या मनात एकच ध्येय होते ‘आजीचे ते स्वप्न पूर्ण करणे?’ चारदा नापास होऊन ती थांबली नाही.आई-वडिलांना लहान वयात गमावूनही आजीच्या प्रेरणेने आयपीएस अंशिका जैन यांनी हार मानली नाही.
ucceचार वेळा अपयश आलं तरी पाचव्या प्रयत्नात UPSC 2022 मध्ये AIR 306 मिळवत त्यांनी आजीचं स्वप्न पूर्ण केलं.
पाचव्या प्रयत्नात, अंशिकाने UPSC 2022 परीक्षेत AIR 306 मिळवत भारतीय पोलिस सेवेत (IPS) स्थान मिळवलं. उच्च पगाराच्या नोकरीच्या संधी नाकारून त्यांनी आपलं संपूर्ण लक्ष आपल्या ध्येयावर केंद्रीत ठेवलं. नंतर त्यांनी IAS अधिकारी वासु जैन यांच्याशी विवाह केला.
अंशिका जैन यांची ही प्रेरणादायी कहाणी दाखवते की, दृढ निश्चय, संयम आणि आत्मविश्वास असला तर कोणतीही अडचण पार करता येते. त्यांनी केवळ स्वतःचं नव्हे, तर आपल्या आजीचं स्वप्नही पूर्ण केलं. वर्दी परिधान करताना त्यांनी सिद्ध केलं की “अशक्य” असं काहीच नसतं, जर मनात जिद्द आणि ध्येय स्पष्ट असेल तर.






