फोटो सौजन्य - Social Media
UPSC ही भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. अनेक जण वर्षानुवर्षे अभ्यास करूनही अपयशी ठरतात. मात्र काही जिद्दी उमेदवार असेही असतात की, जे लाखो रुपये पगाराची नोकरी सोडून देशसेवेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सगळं काही मागे टाकतात. अशीच एक प्रेरणादायी कथा आहे IPS आशीष तिवारी यांची. आशीष तिवारी हे मूळचे मध्य प्रदेशमधील होशंगाबादचे रहिवासी. ते एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेले आहेत. त्यांचे वडील कैलाश नारायण तिवारी हे रेल्वेत अभियंता होते. आशीष यांनी सुरुवातीचे शिक्षण होशंगाबादमध्ये पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी IIT कानपूर येथून कम्प्युटर सायन्समध्ये बी.टेक व एम.टेक पूर्ण केले.
त्यांच्या उत्तम शिक्षणामुळे आंतरराष्ट्रीय कंपन्यांमधून भरघोस पगाराच्या नोकऱ्यांची ऑफर मिळाली. त्यांनी लंडनमधील प्रसिद्ध Lehman Brothers मध्ये इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून काम सुरू केले. तीन वर्षे ते लंडनमध्ये होते, त्यानंतर त्यांनी जपानमध्ये Nomura Bank मध्ये एक्सपर्ट अनालिस्ट म्हणून काम केले. तेथे लाखोंच्या पगारावर स्थिर जीवन होते. पण देशसेवेसाठी मनात धग होती.
वर्ष 2010 मध्ये त्यांनी भारतात परत येण्याचा निर्णय घेतला आणि UPSC सिव्हिल सेवा परीक्षेची तयारी सुरू केली. ही तयारी त्यांनी कोणत्याही कोचिंगशिवाय केली. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी 330वी रँक मिळवत IRS (भारतीय राजस्व सेवा) मध्ये निवड झाली. पण त्यांचे ध्येय मोठे होते, IPS होणे. म्हणून त्यांनी दुसऱ्यांदा प्रयत्न केला.
UPSC CSE 2012 मध्ये त्यांनी ऑल इंडिया 219वी रँक मिळवत आपले स्वप्न पूर्ण केले. त्यांची IPS पदासाठी निवड झाली आणि त्यांना उत्तर प्रदेश कॅडर मिळाला. आज ते सहारनपूर जिल्ह्यात वरिष्ठ पोलीस अधीक्षक (SSP) म्हणून कार्यरत आहेत. त्यांची कहाणी हा एक संदेश देते की, जिथे जिद्द आणि देशप्रेम असते तिथे मार्ग आपोआप निर्माण होतो. आजच्या तरुणांनी आशीष तिवारी यांच्याकडून प्रेरणा घेण्याची गरज आहे – की आपली स्वप्ने कोणत्याही अडचणीपुढे झुकता कामा नयेत.