फोटो सौजन्य - Social Media
सफलतेसाठी केवळ मेहनत नव्हे, तर ती योग्य दिशेने होणंही तितकंच महत्त्वाचं असतं. याचं जिवंत उदाहरण म्हणजे InstaAstro या ॲपचे संस्थापक नितीन वर्मा. कोरोना महामारीच्या कठीण काळात अनेक लोकांचे रोजगार गेले, व्यवसाय थांबले; पण याच काळात नितीन यांच्या मनात एक कल्पना आकार घेत होती. आज ही कल्पना 2 हजारांहून अधिक लोकांना रोजगार देणारी आणि कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय असलेली यशस्वी कंपनी बनली आहे.
नितीन वर्मा हे 2002 च्या बॅचचे आयआयटी कानपूरचे बीटेक पदवीधर. त्यांनी तीन वर्षे नोकरी केल्यानंतर 2005 मध्ये पहिला स्टार्टअप सुरू केला. सुरुवातीला त्यांनी काही अपयश अनुभवले, पण हार मानली नाही. त्यांचा नेहमीचा भर मोबाईल-आधारित ॲप्सवर होता. त्यांच्या KeltenTime आयटी कंपनीने फ्लिपकार्ट, मेकमायट्रिप, पॉलिसीबाजार यांसारख्या कंपन्यांना तांत्रिक सेवा दिली होती. त्यांनंतर त्यांनी Edureka नावाचे दुसरे स्टार्टअप सुरू केले, जे ऑनलाइन टेक कोर्सेस उपलब्ध करून देत होते. मात्र खरी ओळख त्यांना 2021 मध्ये सुरू केलेल्या InstaAstro ने दिली. या ॲपच्या माध्यमातून लोक ज्योतिषांच्या थेट मार्गदर्शनासाठी संपर्क करू शकतात. आज InstaAstro कडे 1 कोटी ग्राहक आणि 2200 हून अधिक प्रोफेशनल ज्योतिषी आहेत.
InstaAstro सुरू करण्यामागेही एक खास अनुभव होता. नितीन यांनी सांगितलं की, आर्थिक अडचणीच्या काळात एका ज्योतिषाने त्यांना आशा दिली. हीच प्रेरणा त्यांनी पुढे घेऊन ऑनलाइन ज्योतिष सेवा देण्याचा निर्णय घेतला. आज InstaAstro भारतासोबत अमेरिका, यूके, ऑस्ट्रेलिया आणि आशियाई देशांमध्ये काम करत आहे. दररोज 1-2 लाख मिनिटांचा ज्योतिष सल्ला ग्राहकांना दिला जातो.
नितीन यांचा भर नेहमी गुणवत्तेवर असतो. त्यांच्या मते, ही सेवा AI कधीच पूर्णपणे घेऊ शकत नाही, कारण ज्योतिष हे मानवी भावना आणि अनुभवांवर आधारित आहे. त्यामुळे हे क्षेत्र भविष्यातही सुरक्षित आहे. नितीन वर्मा यांची ही कहाणी दाखवते की योग्य कल्पना, धैर्य आणि चिकाटी यांमुळे कोणताही माणूस संकटातून संधी शोधू शकतो आणि इतरांसाठीही प्रेरणा बनू शकतो.