फोटो सौजन्य - Social Media
संघर्षाच्या वाटेवर चालत, अपार मेहनतीच्या जोरावर यश प्राप्त करणाऱ्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील यमगे गावचा बिरदेव सिद्दाप्पा डोणे याने आपले स्थान निश्चित केले आहे. पारंपरिक मेंढपाळ कुटुंबातून येणाऱ्या बिरदेवने 2025 मध्ये घेतलेल्या यूपीएससी परीक्षेत देशात 551वा क्रमांक मिळवत आयपीएस अधिकारी होण्याचा मान मिळवला आहे. बिरदेव जेव्हा यूपीएससीचा निकाल लागला तेव्हा तो नेहमीप्रमाणे आपल्या मेंढ्यांना चारण्यासाठी गेला होता. निकालाची बातमी मिळाल्यावर त्याच्या घरात व गावात आनंदाचं वातावरण पसरलं. हा यशाचा क्षण केवळ त्याच्यासाठी नव्हे तर संपूर्ण धनगर समाजासाठी आणि ग्रामीण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा ठरला.
त्याचा शैक्षणिक प्रवासही तितकाच प्रेरणादायी आहे. दहावीला 96 टक्के मिळवून मुरगूड केंद्रात पहिला येणाऱ्या बिरदेवने तेव्हाच ठरवलं होतं, “मी आयपीएस होणार”. बारावीत त्याने 89 टक्के गुण मिळवले आणि पुढे पुण्यातील प्रसिद्ध सीओईपी (COEP) महाविद्यालयातून स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. घरातील अभ्यासाचे पोषक वातावरण नसताना, बिरदेवने गावातील शाळेच्या व्हरांड्यात अभ्यास करून यूपीएससीची तयारी सुरू केली. त्याने सलग दोन प्रयत्नांमध्ये अपयश पाहिलं, पण त्याने हार मानली नाही. तिसऱ्या प्रयत्नात त्याने धीर राखून अभ्यास केला आणि अखेर 551वा क्रमांक मिळवून आयपीएस पदावर नियुक्ती मिळवली.
यश मिळवण्यासाठी मेहनतीबरोबरच सातत्य आणि जिद्द लागते हे बिरदेवने दाखवून दिलं. आज त्याचे आई-वडील, कुटुंब आणि गावकरी अभिमानाने त्याचे कौतुक करत आहेत. विशेषतः वडिलांनी फेटा बांधून केलेलं अभिनंदन हा क्षण अविस्मरणीय ठरला. बिरदेवचा प्रवास ग्रामीण भागातील, मर्यादित साधनसंपत्ती असणाऱ्या तरुणांसाठी मोठी प्रेरणा आहे. आजचा संघर्ष हेच उद्याच्या यशाचे पाय आहेत, हे त्याने आपल्या आयुष्याने दाखवून दिलं आहे. बिरदेवचे हे यश फक्त ग्रामीण महाराष्ट्र नव्हे तर देशातील सर्व तरुणवर्गासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. सगळ्यांनी बिरदेवचे यश पाहून त्याचा आदर्श घेतला पाहिजे.