
फोटो सौजन्य - Social Media
सरकारी बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. युको बँकेने (UCO Bank) जनरलिस्ट आणि स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर केली असून, पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. बँकिंग क्षेत्रात सुरक्षित आणि प्रतिष्ठित नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी मानली जात आहे.
या भरती अंतर्गत युको बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी विविध विभागांमध्ये नियुक्ती केली जाणार आहे. यामध्ये ट्रेड फायनान्स ऑफिसर, नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेटर, डेटाबेस अॅडमिनिस्ट्रेटर, सिस्टीम अॅडमिनिस्ट्रेटर, क्लाउड इंजिनियर, सायबर सिक्युरिटी ऑफिसर, डेटा प्रायव्हसी ऑफिसर आणि डेटा अॅनालिस्ट अशा पदांचा समावेश आहे. विशेष म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट (CA) पदवीधरांसाठी स्वतंत्र संधी उपलब्ध करून देण्यात आली असून, सीए उमेदवारांसाठी तब्बल ७५ जागा राखीव आहेत.
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया १३ जानेवारी २०२६ पासून सुरू झाली असून, इच्छुक उमेदवारांना २ फेब्रुवारी २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यामुळे अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे मर्यादित कालावधी उपलब्ध असून, अंतिम तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून, उमेदवारांनी युको बँकेच्या अधिकृत वेबसाइट www.uco.bank.in वर जाऊन अर्ज करावा.
या भरती अंतर्गत एकूण १७३ पदे भरली जाणार आहेत. प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वेगवेगळा असणार आहे. ट्रेड फायनान्स ऑफिसर पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात, मात्र एमबीए पदवी आणि किमान १ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. चार्टर्ड अकाउंटंट पदासाठी ICAI मधून सीए उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. JMGS-I स्केलसाठी किमान १ वर्षाचा, तर MMGS-II स्केलसाठी किमान ३ वर्षांचा अनुभव अपेक्षित आहे. इतर तांत्रिक पदांसाठी बी.ई./बीटेक (कंप्यूटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन), एमसीए किंवा एमएससी कॉम्प्युटर सायन्स पदवी आवश्यक असून, संबंधित क्षेत्रातील १ ते ३ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे.
या भरतीसाठी २० ते ३५ वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. JMGS-I स्केलसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ४८,४८० ते ८५,९२० रुपये, तर MMGS-II स्केलसाठी ६४,८२० ते ९३,९६० रुपयांपर्यंत मासिक पगार दिला जाणार आहे. यासोबतच महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA) तसेच वैद्यकीय सुविधा मिळणार आहेत. या भरतीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, ग्रुप डिस्कशन आणि वैयक्तिक मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. त्यामुळे बँकिंग क्षेत्रात स्थिर आणि चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची ही मोठी संधी असून, पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.