

५ वर्षांत ३६ हजारांहून अधिक तरुणांना सरकारी नोकऱ्या
३.१० लाखांहून अधिक महिला बनल्या 'लखपती दीदी'
एक लाख कोटींहून अधिक गुंतवणूक प्रकल्प सुरू
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी गुरुवारी देहरादून इथे झालेल्या कार्यक्रमात राज्य सरकारच्या पाच वर्षांच्या कामाचा अहवाल म्हणजेच 'रिपोर्ट कार्ड' जाहीर केला. नोकरी, महिला सक्षमीकरण, गुंतवणूक, पायाभूत सुविधा, आरोग्य आणि पर्यटन अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कामांचा आढावा त्यांनी यावेळी मांडला.
गेल्या पाच वर्षांत 36 हजारांहून जास्त तरुणांना सरकारी नोकऱ्या दिल्याचं, तर ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटमध्ये मिळालेल्या गुंतवणूक प्रस्तावांपैकी एक लाख कोटी रुपयांहून जास्त रकमेचे प्रकल्प प्रत्यक्षात सुरू झाल्याचं धामी यांनी सांगितलं.
या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा, डॉ. रमेश पोखरियाल निशंक, तीरथ सिंह रावत आणि त्रिवेंद्र सिंह रावत, राज्यसभा खासदार महेंद्र भट्ट यांच्यासह मंत्री, आमदार आणि इतर लोकप्रतिनिधी हजर होते.
धामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या पाच वर्षांत पारदर्शक भरती प्रक्रियेतून 36 हजारांहून जास्त तरुणांना सरकारी नोकऱ्या मिळाल्यात. भरती परीक्षातल्या गैरप्रकारांना आळा घालायला कडक नकलविरोधी कायदाही लागू करण्यात आला. सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना 30 टक्के आडवं आरक्षण देण्यात आलं.
महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने राज्यातल्या 3.10 लाखांहून जास्त महिला 'लखपती दीदी' बनल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. बचत गटातल्या महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी म्हणून 'हाऊस ऑफ हिमालयाज' हा ब्रँड सुरू करण्यात आला, आणि त्याच्या उत्पादनांची विक्री सहा कोटी रुपयांच्या पुढे गेल्याचंही त्यांनी सांगितलं.
डिसेंबर 2023 मध्ये झालेल्या ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटमध्ये उत्तराखंडसाठी 3.56 लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक प्रस्ताव आले होते. त्यातले एक लाख कोटी रुपयांहून जास्त रकमेचे प्रकल्प प्रत्यक्षात सुरू झाल्याचं धामी यांनी सांगितलं. राज्यात उद्योग आणि गुंतवणुकीला चालना द्यायला 30 हून जास्त नवी धोरणं लागू करण्यात आली आहेत.
शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज दिलं जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. अटल आयुष्मान योजनेखाली राज्यात 63.32 लाख आयुष्मान कार्ड बनवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
समान नागरी संहिता (UCC) लागू करणारं उत्तराखंड हे स्वातंत्र्यानंतरचं देशातलं पहिलं राज्य ठरल्याचं सरकारने आपल्या कामगिरीत सांगितलं. राज्यात 27 जानेवारी 2025 पासून हा कायदा लागू करण्यात आला. पायाभूत सुविधांबद्दल बोलताना धामी यांनी जवळपास 12 हजार कोटी रुपये खर्चाचा दिल्ली-देहरादून इकॉनॉमिक कॉरिडोर पूर्ण झाल्याचं सांगितलं. ऋषिकेश-कर्णप्रयाग रेल्वे प्रकल्पाचं जवळपास 75 टक्के काम पूर्ण झालं. यंदाच्या चारधाम यात्रेदरम्यान 65 लाखांहून जास्त भाविकांनी दर्शन घेतल्याची माहितीही त्यांनी दिली.
उत्तराखंडमध्ये झालेल्या 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत राज्याच्या खेळाडूंनी 103 पदकं जिंकली. ही कामगिरी राज्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी महत्त्वाची असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कोविड काळात पर्यटन, वाहतूक, आरोग्य आणि महिला बचत गटांना मदत करायला खास पॅकेजेस दिल्याचाही त्यांनी उल्लेख केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि केंद्र-राज्य समन्वयातून उत्तराखंडला विकसित, आत्मनिर्भर आणि समृद्ध राज्य बनवायचं उद्दिष्ट असल्याचं धामी यांनी सांगितलं. वर्ष 2047 पर्यंत विकसित भारताच्या संकल्पनेशी जुळणारा विकास साधायचा सरकारचा निर्धार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.