फोटो सौजन्य - Social Media
विरार येथील विवा महाविद्यालयाला २०२४ या वर्षासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच, राज्यस्तरीय उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून पाचव्या क्रमांकाचा बहुमानही मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. करिअर कट्टा राज्यस्तरीय स्पर्धा पुरस्कार वितरण सोहळा २०२५ नुकताच यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे पार पडला.
या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील ५० महाविद्यालयांची निवड करण्यात आली होती. विवा महाविद्यालयाने करिअर कट्टा उपक्रमांतर्गत विविध उपक्रम आणि योजना राबवून पालघर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवत A+ ग्रेडसह सेंटर ऑफ एक्सलन्स पुरस्कार मिळवला. महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते महाविद्यालयाला हा सन्मान प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे, सलग दोन वर्षे हा पुरस्कार मिळवणारे विवा महाविद्यालय हे पालघर जिल्ह्यातील पहिले महाविद्यालय ठरले आहे.
या सोहळ्यात विवा महाविद्यालयाच्या करिअर कट्टा सह-समन्वयक डॉ. रोहन गवाणकर यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट महाविद्यालय समन्वयक (पाचवा क्रमांक) म्हणून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात पॉवर ऑफ सेक्टर स्किल कॉन्सिलचे सचिव प्रफुल पाटक, प्री-आयएएस ट्रेनिंग सेंटर मुंबईच्या संचालिका भावना पाटोळे, महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक विनोद मोहितकर, मुंबई वाहतूक शाखेचे उपआयुक्त मितेश घट्टे, खादी ग्रामीणचे संचालक बिपीन जगताप आणि करिअर कट्टाचे अध्यक्ष यशवंत शितोळे उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या वतीने हा सन्मान उपप्राचार्या आणि करिअर कट्टा विभागीय समन्वयक (मुंबई विभाग) डॉ. दीपा वर्मा आणि एनसीसी प्रमुख वैभव सातवी यांनी स्वीकारला. या उल्लेखनीय यशाबद्दल विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर, संस्थेच्या सेक्रेटरी अपर्णा ठाकूर, खजिनदार शिखर हितेंद्र ठाकूर, व्यवस्थापन समितीचे सदस्य संजीव पाटील, संजय पिंगुळकर, एस. एन. पाध्ये, विवा महाविद्यालयाचे समन्वयक नारायण कुट्टी, प्राचार्य वी. श. अडिगल आणि उपप्राचार्या डॉ. प्राजक्ता परांजपे यांनी महाविद्यालयाला शुभेच्छा दिल्या.
विवा महाविद्यालयाने शैक्षणिक गुणवत्तेसोबतच कौशल्यविकासाला चालना देणाऱ्या विविध उपक्रमांवर भर दिला आहे. त्यामुळेच, पालघर जिल्ह्यातील हे महाविद्यालय राज्यातील अग्रगण्य महाविद्यालयांपैकी एक म्हणून ओळखले जात आहे. हा पुरस्कार महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील उल्लेखनीय यशाचे प्रतीक आहे.