फोटो सौजन्य - Social Media
जर तुम्हाला तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात करिअर करायचं असेल, पण गणिताची भीती वाटत असेल, तर चिंता करण्याचं काहीच कारण नाही. आजच्या घडीला अनेक असे कोर्सेस उपलब्ध आहेत जे गणिताशिवाय देखील तुम्हाला तंत्रज्ञान व डिजिटल जगात उज्वल भविष्य घडवण्याची संधी देतात. सर्वात प्रसिद्ध कोर्स म्हणजे BCA (Bachelor of Computer Applications). हा तीन वर्षांचा कोर्स असून त्यामध्ये प्रोग्रामिंग, वेब डेव्हलपमेंट, डेटाबेस यासारख्या टेक्निकल गोष्टी शिकवल्या जातात. काही विद्यापीठांमध्ये गणित बंधनकारक नसते. यामध्ये करिअर ऑप्शन्स आहेत: वेब डेव्हलपर, सॉफ्टवेअर डेव्हलपर, डेटा अॅनालिस्ट. वार्षिक पगार 3 ते 10 लाख रुपयांपर्यंत मिळू शकतो.
BSc इन अॅनिमेशन आणि मल्टिमिडिया हा कोर्स देखील तीन वर्षांचा असून त्यात ग्राफिक डिझाईन, 2D/3D अॅनिमेशन, व्हिडिओ एडिटिंग यावर प्रशिक्षण दिलं जातं. यामध्ये एनिमेटर, गेम डिझायनर, व्हिडिओ एडिटर यासारखे करिअर ऑप्शन उपलब्ध आहेत. तुम्हाला डिझाईनमध्ये रस असेल तर Bachelor of Design (BDes) एक उत्तम पर्याय आहे. UI/UX डिझाइन, फॅशन डिझाईन, ग्राफिक डिझाईन, प्रॉडक्ट डिझाईन यांसारख्या क्षेत्रात करिअर करता येते. सुरुवातीसच 5 ते 20 लाखांचा पगार मिळण्याची शक्यता असते.
Bachelor of Mass Communication (BMC) हा कोर्स तंत्रज्ञान आणि कम्युनिकेशन यांची आवड असणाऱ्यांसाठी उत्तम आहे. टेक जर्नलिझम, डिजिटल मीडिया प्लॅनिंग आणि कंटेंट क्रिएशन यामध्ये करिअर करण्याची संधी यात मिळते.
शॉर्ट टर्ममध्ये जॉब करायचा असेल तर Web Development किंवा App Development डिप्लोमा हा 6 महिने ते 1 वर्षांचा कोर्स आहे. त्यामध्ये तुम्हाला प्रत्यक्ष वेबसाईट आणि अॅप तयार करायला शिकवलं जातं. यातून तुम्ही फ्रीलान्सर किंवा स्टार्टअप्ससाठी काम करू शकता. Digital Marketing हा आणखी एक भरभराट करणारा कोर्स आहे. यात SEO, सोशल मीडिया मार्केटिंग, ईमेल मार्केटिंग अशा गोष्टी शिकवल्या जातात. 3 ते 12 महिन्यांच्या कोर्सनंतर 4 ते 15 लाखांचा पगार मिळू शकतो. गणित नसतानाही तंत्रज्ञानात करिअर करणे शक्य आहे, फक्त योग्य कोर्सची निवड करा आणि आजपासून सुरुवात करा!