भंडारा : भंडारा जिल्ह्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. भंडाऱ्यातील जवाहरनगर येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये मोठा स्फोट झाला आहे. कारखान्यातील आर. के. ब्रांच सेक्शनमध्ये झालेल्या या स्फोटात ५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. तर अनेक कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत या घटनेनंतर पोलीस आणि बचाव पथके घटनास्थळी रवाना झाली असून मदतकार्यास सुरूवात झाली आहे. पण या स्फोटामुळे सध्या संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
कारखान्यातील स्फोटाचे फोटोही समोर येत आहेत, ज्यामध्ये शस्त्रे बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जड साहित्याचे तुकडे विखुरलेले दिसत आहेत. रुग्णवाहिकाही घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्यासह सुरूवात झाली आहे. पण स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की संपूर्ण परिसरात घबराट पसरली आणि लोक इकडे तिकडे धावू लागले.
मिळालेल्या माहितीनुसार, जवाहरनगर येथील ऑर्डनन्स फॅक्टरीच्या आर. के. सेक्शनमध्ये १४ कामगार कार्यरत होते. आज सकाळी 11 च्या सुमारास, याच आर.के सेक्शनमध्ये मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की काही क्षणातच संपूर्ण मजला कोसळला. इमारतीच्या कोसळलेल्या ढिगाऱ्याखाली जवळपास 10-12 कामगार अडकल्याची शक्यता आहे. स्फोटाची माहिती मिळताच पोलिसांनी आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे आणि काही कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या स्फोटाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
भंडारा येथील अपघाताबाबत बोलताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, “मला स्फोटाची प्राथमिक माहिती मिळाली आहे. यात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सध्या पाच जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे.”
कार्यालयातच नव्हे तर घरून काम करतानाही वास्तूच्या या नियमांकडे लक्ष द्या
आमदार नरेंद्र भोंडेकर म्हणाले की, ” ही घटना अत्यंत भीषण असून या स्फोटामुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्याचे काम सुरू असून, कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आणि प्रशासनाचे सर्व अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या परिसरात युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली. सध्या या दुर्घटनेचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे आणि अधिक माहिती प्राप्त होण्याची अपेक्षा आहे.
जवाहरनगर येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये झालेल्या स्फोटाचा आवाज 3 ते 4 किलोमीटर पर्यंत पोहोचला, ज्यामुळे परिसरात मोठी घबराट पसरली. स्फोटानंतर भीषण आग लागली आणि धुराचे लोट दूरवरून दिसत होते. अनेक स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांनी हा धुर आणि स्फोट मोबाईलमध्ये टिपला आणि ते चित्रीकरण सोशल मीडियावर शेअर केले. स्फोट साधारणपणे सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास झाला, अशी माहिती आहे.