संग्रहित फोटो
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. पोलिस अंमलदार हंबर्डे हा २०१४ मध्ये भरती झाला आहे. त्याची नेमणूक फुरसूंगी पोलिस ठाण्यात होती. तो पोलिस ठाण्याच्या सायबर सेलमध्ये कर्तव्यास होता. दरम्यान, तक्रारदारांचे उरूळी देवाची परिसरातील सह्याद्री चौकात किराणा दुकान आहे. तीन दिवसांपुर्वी (दि. ८ ऑक्टोबर) सकाळी सातच्या सुमारास हंबर्डे आणि खासगी व्यक्ती गेले. त्यांनी पोलिस असल्याचे सांगत दुकानदाराकडे गुटखा विक्रीबाबत विचारणा केली. नंतर दुकानातील अतिरिक्त माल ठेवलेल्या खोलीतून विमल सुगंधी सुपारीच्या दोन गोण्या ताब्यात घेतल्या. नंतर गुटखा विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची धमकी देत कारवाई टाळण्यासाठी ५ लाखांची खंडणी मागितली. या व्यावसायिकाला पोलिस ठाण्यात देखील आणले.
एवढी रक्कम देणे शक्य नसल्याचे दुकानदाराने सांगितल्यानंतर सेटलमेंट करून व्यावसायिकाकडून १ लाख ६५ हजार रुपये तडजोडीत घेतले. पैसे घेतल्यानंतर गुटखा परत देखील केला. परंतु, पुन्हा व्यावसायिकाला पोलिस ठाण्यात बोलवून प्रचंड मानसिक त्रास देण्यात आला. आणखी पैसांसाठी हा त्रास दिल्याची माहिती आहे. या त्रासानंतर संबंधित व्यावसायिकानेच थेट पोलिस ठाण्याच्या वरिष्ठांकडे याची तक्रार केली.
या तक्रारीनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची चौकशी केली. तेव्हा स्टेशन डायरी किंवा याप्रकाराबाबत पोलिस ठाणे स्थरावर कोणालाही काही न कळविल्याचे समोर आले. त्यानंतर प्राथमिक चौकशी करून थेट पोलिस अंमलदारासह दोघांवर खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास फुरसूंगी पोलिस करत आहेत.
दुकानातील कॅमेऱ्यात संभाषण कैद
दुकानातील कॅमेऱ्यात हा प्रकार कैद झाला होता. तो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आरोपी पोलिस हंबर्डेचे संभाषण कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाले आहे. सायबरचे कर्तव्य असताना देखील तो साध्या वेशात या दुकानात पोहचला होता. दुकानदाराचा नोकर १ लाख ६५ हजार रुपये घेऊन आला होता. ते पैसे पोलिसाने घेतले आहेत. नंतर दुकानदाराच्या गुटख्याच्या गोण्या त्याने परत केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.






