Pune Crime News : कारगिल युद्धात भारतातील शेकडो जवानांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. भारतासाठी ही लढाई अत्यंत निर्णायक आणि ऐतिहासिक होती. पण याच कारगिल युद्धात लढलेल्या एका जवानाची नागरिकता सिद्ध करण्यास भाग पाडल्याचा गंभीर आरोप निवृत्त सैनिक हकीमुद्दीन शेख यांच्या कुटुंबियांकडून कऱण्यात आला आहे. “वडिलांनी देशासाठी लढा दिला, आज त्यांना नागरिकत्व सिद्ध करायला सांगितलं जात आहे,” अशी प्रतिक्रिया हकीमुद्दीन शेख यांच्या नातेवाइकांनी दिली. १९९९ च्या कारगिल युद्धात सहभागी झालेल्या हकमुद्दीन शेख यांच्या कुटुंबाने ही कारवाई अनपेक्षित आणि अपमानकारक असल्याचे म्हटले आहे.
पोलिसांसह ३० ते ४० जणांच्या गटाने त्यांच्या चंदननगर येथील राहत्या घरी छापा टाकत त्यांना त्यांच्या भारतीय नागरिकत्वाचा पुरावा सादर करण्यास भाग पाडले.ही घटना शनिवारी (२७ जुलै) रात्री उशिरा घडली. मध्यरात्री काही लोकांनी घरी येऊन ओळखपत्रे आणि अन्य कागदपत्रांची मागणी केली. त्यानंतर घरातील पुरुष सदस्यांना पोलिस ठाण्यात नेण्यात आले.
५८ वर्षीय हकीमुद्दीन शेख यांनी १९८४ साली लष्कराच्या २६९ अभियंता रेजिमेंटमध्ये भरती होऊन तब्बल १६ वर्षे सेवा दिली. १९९९ च्या कारगिल युद्धातही त्यांनी सहभाग घेतला होता. २००० मध्ये निवृत्त झाल्यानंतर काही काळ प्रतापगडमध्ये वास्तव्य केले, मात्र त्यांचे कुटुंब आजही पुण्यात वास्तव्यास आहे. त्यांचे मूळ गाव उत्तर प्रदेशातील प्रतापगड असून, १९६० पासून त्यांचे कुटुंब पुण्यात राहत आहे.
तर हकीमुद्दीन शेख म्हणाले, “मी १६ वर्षे भारतीय सैन्यात अभिमानाने सेवा दिली. १९९९ च्या कारगिल युद्धात लढलो. माझे संपूर्ण कुटुंब भारतीय आहे. मग आज आम्हाला आमचे नागरिकत्व सिद्ध करावे लागत आहे?”असं म्हणत माजी सैनिक हकीमुद्दीन शेख यांनी उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे. २६ जुलैच्या रात्री पुण्यातील चंदननगर परिसरात, हकीमुद्दीन शेख यांच्या कुटुंबाच्या घरी पोलिसांसह ३० ते ४० लोकांनी धाड घालून कागदपत्रांची मागणी केली, असा गंभीर आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
५८ वर्षीय हकीमुद्दीन शेख हे उत्तर प्रदेशातील प्रतापगडचे मूळ रहिवासी आहेत. १९८४ ते २००० या काळात भारतीय सैन्याच्या २६९ व्या अभियंता रेजिमेंटमध्ये त्यांनी नाईक हवालदार म्हणून सेवा दिली. त्यानंतर काही काळ पुण्यात राहून २०१३ मध्ये ते मूळ गावी परतले. मात्र, त्यांचे कुटुंबीय अजूनही पुण्यात स्थायिक आहेत.
हकीमुद्दीन यांचा पुतण्या नौशाद शेख म्हणाला, “ते लोक घरात घुसून आरडाओरडा करत होते. आम्ही आधार कार्डसारखी ओळखपत्रे दाखवली, तरी त्यांनी त्यांना बनावट ठरवले. महिलांवरही ओरडण्यात आले. या सर्वांमध्ये पोलिस देखील होते, पण जमावाला रोखण्याऐवजी फक्त पाहत होते.” कुटुंबाच्या मते, पोलिस व्हॅन घराजवळ थांबलेली होती. त्यात एक गणवेशधारी अधिकारी उपस्थित होता, पण घरात आलेले बहुतेक लोक साध्या वेशातील होते आणि स्वतःला पोलीस म्हणून ओळखत नव्हते.
पोलिस उपयुक्त (DCP) सोमय मुंडे यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “चंदननगर परिसरात काही बेकायदेशीर स्थलांतरितांविषयी माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली. ओळखपत्रांची मागणी केली आणि भारतीय नागरिकत्व स्पष्ट झाल्यानंतर सर्वांना सोडून देण्यात आले. आम्ही कोणत्याही तृतीयपंथी व्यक्तीसोबत घटनास्थळी गेलो नव्हतो आणि आमच्याकडे याचे व्हिडिओ फुटेजही उपलब्ध आहे.”