संग्रहित फोटो
ही घटना ७ एप्रिल रोजी रात्री घडली असून याबाबत १६ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. अनुज अशोक भोईटे (वय २३), रोशन राजेंद्र राणे (वय २५), संकेत संजय शेळके (वय २७), अक्षय शरद चौधरी (वय २६) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह कमलेश अशोक पाटील (वय २५), रोहित सयाजी जाधव (वय २५), अब्दुल्ला (वय १९, सर्व रा. चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मनोज भिल्लू राठोड (वय ३४, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनोज राठोड आणि त्यांचा मित्र सतीश सोपानराव भोईने या दोघांना आरोपी अनुज भोईटे याचा धक्का लागला. त्यावरून भोईटे याने त्याच्या साथीदारांसोबत मिळून मनोज राठोड आणि त्यांचा मित्र सतीश भोईने यांना घरात घुसून मारहाण केली. घरातून बाहेर रस्त्यावर नेऊन आरोपींनी दोघांना बेदम मारहाण केली. अनुज भोईटे याने मनोज राठोड यांच्या डोळ्यावर हातातील कड्याने मारून त्यांना जखमी केले. मनोज राठोड यांनी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर याबाबत तक्रार दिली आहे. पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. आरोपी अनुज भोईटे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात देहूरोड पोलीस ठाण्यात शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. चिंचवड पोलिस अधिक तपास करीत आहेत.
एका बुक्कीत पत्नीचे नाक केले फ्रॅक्चर
दोघांच्या नावावर असलेल्या फ्लॅटची विक्री करण्याबाबत कोणत्याही कागदपत्रावर सही करण्यास पत्नीने नकार दिल्यानंतर त्याचा राग आल्याने पतीने जोरात ठोसा मारून पत्नीच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका ४५ वर्षाच्या महिलेने कोथरुड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी ४७ वर्षीय पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना त्यांच्या राहत्या घरी १५ एप्रिल रोजी सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.






