सौजन्य फोटो - सोशल मिडीया
भंडारा : पत्नीला वाचवण्यासाठी पतीने कालव्यात उडी घेतली; मात्र या प्रयत्नात दोघांचाही बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील कोरंभी येथे घडली. स्वप्निल बनकर आणि त्यांच्या पत्नी प्रज्ञा बनकर अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत. या घटनेमुळे कोरंभी गावावर शोककळा पसरली असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथे वास्तव्यास असलेले स्वप्निल आणि प्रज्ञा बनकर हे आपल्या मूळ गावी कोरंभी येथे आले होते. शेतातून परतत असताना प्रज्ञा या पाय धुण्यासाठी कालव्याच्या पायऱ्यांजवळ गेल्या. त्यावेळी अचानक त्यांचा पाय घसरला आणि त्या खोल पाण्यात पडल्या. पत्नी पाण्यात पडल्याचे लक्षात येताच स्वप्निल यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांना वाचवण्यासाठी कालव्यात उडी घेतली. मात्र कालव्यातील पाण्याची खोली आणि प्रवाहाचा वेग यामुळे परिस्थिती गंभीर झाली. पत्नीला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्वप्निल यांनाही पाण्यातून बाहेर पडता आले नाही.
या दुर्घटनेत स्वप्निल आणि प्रज्ञा या दोघांचाही बुडून मृत्यू झाला. पत्नीला वाचवण्यासाठी पतीने केलेला प्रयत्न अखेर अपयशी ठरल्याने या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एकाच वेळी दाम्पत्याचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती मिळताच कोरंभी गावात शोककळा पसरली. एका क्षणात घडलेल्या या दुर्घटनेमुळे गावात दुःखाचे वातावरण आहे. कालवे, नदी आणि इतर जलस्रोतांच्या परिसरात वावरताना नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाली आहे.






