वसई । रविंद्र माने : चित्रपटसृष्टीत हेअर ड्रेसर असलेल्या नायगावातील नयना महंत या तरुणीच्या हत्या प्रकरणात नायगाव २५ जणांचे जबाब नोंदवून पोलिसांनी वसई न्यायालयात ६२२ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. नयना महंत (२८) आणि तिचा सहकारी मनोहर शुक्ला यांचे प्रेमसंबंध होते. मात्र, मनेहरने तिच्या विवाह न करता पूर्णिमा शी लग्न केले होते. त्यामुळे नयना आणि मनोहरमध्ये वारंवार भांडणे होत होती. लग्नाचे आमीष दाखवून बलात्कार केल्याचा गुन्हा वालीव पोलीस ठाण्यात नयनाने दाखल केला होता. सदर तक्रार मागे घेण्यावरूनही दोघांमध्ये भांडणे व्हायची. त्यामुळे ९ सप्टेंबरला मनोहरने नयनाचे तोंड पाण्याच्या बादलीत बुडवून तिची हत्या केली होती.
हा गुन्हा पचवण्यासाठी मनोहरने पत्नीच्या मदतीने नयनाचा मृतदेह बॅगेत भरुन गुजरातच्या वलसाड येथे नेऊन टाकला होता. मृतदेहाची दुर्गंधी पसरु नये यासाठी सुटकेसमध्ये त्यांनी मोहरीच्या बिया टाकल्या होत्या. वलसाड-पार्डी येथील पार नदीच्या किनाऱ्यावर त्यांनी हा मृतदेह टाकला तर सुटकेस दुर फेकली होती. मोहरीच्या बियांमुळे मृतदेह कुजल्यावर दुर्गंधी येणार नाही असे त्यांना वाटले होते. मात्र याच मोहरीचे रोपटे त्यांच्या खूनात पुरावा म्हणून समोर आले आहे. घटनास्थळी मोहरीच्या बिया रुजून रोपे उगवली होती. ती रोपे, मोहरी घेतलेल्या दुकानदार, नयनाचे तोंड बुडवलेली बादली आणि पाणी, मृतदेह कोंबलेली बॅग लिफ्टमधून खाली आणताना पाहणारा सुरक्षा रक्षक अशा २५ जणांचे जबाब नोंदवून पोलीसांनी ६२२ पानांचे दोषारोपपत्र वसई न्यायालयात दाखल केले आहे. याप्रकरणी शुक्ला दांपत्याला यापुर्वीच अटक करण्यात आली आहे.
Web Title: Cine artist naina mahant murder case vasai virar palghar crime case maharashtra police maharashtra crime case