सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : गणेशोत्सवातील तीव्र आवाजाच्या डीजेचा वाद सुरू असतानाच शहरात वर्षभर वेगवेगळ्या निमित्ताने लावलेल्या साऊंड सिस्टीमच्या कर्णकर्कश आवाजाने नागरिक त्रस्तच असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून, गेल्या आठ महिन्यात पुणे पोलिसांकडे तब्बल १४ हजार ३९२ कॉल्स आवाजासंदंर्भात आले आहेत. दरम्यान, या आठ महिन्यातच ध्वनी प्रदूषणाबाबत शहरात ४१३ गुन्हे नोंदवले आहेत.
पुणे शहरात वर्षभर सण, उत्सव, मिरवणुका, खासगी पार्ट्या तसेच विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने ध्वनिक्षेपकांचा वापर केला जातो. मात्र, निर्धारित मर्यादेपेक्षा मोठ्या आवाजात डीजे आणि ध्वनिक्षेपक वाजविल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. याच त्रासातून पुणेकरांनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षासह विविध माध्यमातून तक्रारी केल्या आहेत. गेल्या आठ महिन्यात पोलिसांकडे या संदंर्भाने जवळपास १४ हजार ३९२ तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत. पोलिसांनी संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी देखील केली. त्यानंतर याची प्राथमिक तपासणीनंतर आठ महिन्यात (जानेवारी ते ऑगस्ट) ४१३ गुन्हे नोंदवले आहेत.
पुणे शहरात यंदा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजेच्या आवाजासंदंर्भात प्रथमच तीव्र विरोध सुरू झाला आहे. रविवारी पुणेकर नागरिकांनी मोठा मोर्चा काढून त्याला विरोध देखील केला. दरम्यान, पोलिस प्रशासनाने देखील यंदा स्पष्ट भूमिका घेत ‘चार बेस, चार टॉप’ची मर्यादा आखून दिली आहे. दहीहंडीत देखील हाच फॉम्युर्ला होता. शनिवारी बहुंताश मंडळांनी चार बेस चार टॉप लावूनच उत्सव साजरा केला. तुलनेने आवाज कमी झाला असली तरीही डेसिबलची पातळी ओलांडली गेली आहे.
पोलिसांनी कारवाईचा जोर वाढवला
पोलिसांनी जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत ध्वनीप्रदूषण करणाऱ्यांविरोधात ४१३ गुन्हे दाखल केले असून, विविध उत्सव, कार्यक्रम, मिरवणूका तसेच पब, ईदच्या मिरवणुका, खासगी पार्ट्या तसेच अन्य आस्थापनांचा त्यात समावेश आहे. २०२५ मध्ये संपूर्ण वर्षभरात ध्वनीप्रदूषणाचे ४५० गुन्हे दाखल झाले होते. त्यामुळे यंदा ८ महिन्यांतच गतवर्षाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल झाले आहेत.
दहीहंडीत १ हजार १०० मंडळांचे रेडिंग नोंदवले
दहीहंडी उत्सवात ‘चार बेस, चार टॉप’ची मर्यादा होती. काही मंडळांनी डीजेमुक्त उत्सव साजरा केला. मात्र, उपनगरांसह काही भागांत मर्यादित साउंड सिस्टीम असूनही मोठ्या आवाजात संगीत वाजविण्यात आले. शनिवारी झालेल्या दहीहंडी उत्सवात पोलिसांनी तब्बल ११०० मंडळांचे ‘रेडिंग’ नोंदवले आहे. त्याचे परीक्षण करून नियमभंग करणाऱ्या मंडळांवर कारवाई केली जाणार आहे. बिबवेवाडी परिसरात ध्वनीप्रदूषण केल्याप्रकरणी एका मंडळाविरोधात गुन्हाही दाखल झाला आहे.
ईदच्या मिरवणुकांत १४८ गुन्हे
ईद-ए-मिलादच्या मिरवणुकांमध्ये उच्च क्षमतेच्या ध्वनिक्षेपकांचा वापर केल्याप्रकरणी एकूण १४८ गुन्हे दाखल करण्यात आले. काही ठिकाणी ध्वनीची पातळी तब्बल १३० ते १५० डेसिबलपर्यंत पोहोचल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानुसार ५१ मंडळांवर गुन्हे नोंदवले तर प्लाझ्मा आणि प्रेशर मीडचा वापर करणाऱ्या ९७ मंडळांवर कारवाई करण्यात आली असून, सहा डीजे सिस्टीम जप्त करण्यात आल्या आहेत.
आता गणेशोत्सवात डेसिबल मीटर
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ध्वनीप्रदूषणाविरोधातील नियम कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. ध्वनीची पातळी डेसिबल मीटरने मोजली जाणार आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास ध्वनीपातळीची नोंद, व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि अन्य पुरावे संकलित करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त प्रशांत अमृतकर यांनी ध्वनीप्रदूषण करणाऱ्यांविरोधातील कारवाई गणेशोत्सवात आणखी तीव्र केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
फक्त उत्सवच नव्हे, खासगी ठिकाणीही कारवाई
पुणे शहरात आता फक्त उत्सव, सण तसेच जंयतीतच आवाजासंदंर्भात कारवाई केली जात नसून, पब, रूफटॉप कॅफे आणि अन्य आस्थापनांनाही ध्वनीप्रदूषणाच्या नियमांनुसार कारवाई सुरू आहे. बंडगार्डन, विमाननगर, खराडी, बालेवाडी, बाणेर तसेच अन्य भागातील आस्थापनांवर या संदंर्भाने कारवाई सुरू आहे. त्यामुळे उत्सवाचा जल्लोष असो अथवा पबमधील पार्टी; मर्यादा ओलांडली तर कारवाई होईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
३३ ठिकाणी १०० डेसिबलपेक्षा अधिक आवाज
डीजेविरोधीत पुणेकर मंचाच्या वतीने पुण्यातील विविध भागांत ध्वनी प्रदूषणाची नोंद घेतली असून, आतापर्यंत ५९ ठिकाणी ध्वनी तीव्रतेच्या उल्लंघन झाल्याचा दावा मंचाने केला आहे. ५९ पैकी तब्बल ३३ ठिकाणी आवाजाची तीव्रता १०० डेसिबलपेक्षा अधिक असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे. नागरिकांनी प्रत्यक्ष ठिकाणी आवाजाची पातळी आणि स्थानाची नोंद करून हा डेटा संकलित केला. शहरातील विविध भागांतून तक्रारी नोंद झाल्या आहेत. त्यामुळे मंचाने ध्वनी प्रदूषण नियंत्रणासंदंर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.






