भिवंडी : केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील (Kapil Patil) यांच्या नावाने अज्ञाताने फेसबुकवर अकाऊंट (Facebook Account) उघडले आहे. त्याद्वारे अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट (Friend Request) पाठवून पैशांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या वतीने भिवंडीतील (Bhiwandi) नारपोली पोलीस ठाण्यात (Narpoli Police station) सायबर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कपिल पाटील यांच्या नावाने बनवण्यात आलेले फेसबुक अकाऊंट ब्लॉक करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसापासून कपिल पाटील यांचे नावाने फेक फेसबूक अकाऊंट उघडून अज्ञात ठगाकडून फ्रेंड रिक्वेस्ट पाठविल्या जात होत्या. विशेष म्हणजे याच फेसबुक अकाऊंटवरून समोरच्या व्यक्तीला ऑनलाईन पैशांची मागणी केली जात होती.
एका तरुणाकडे मंत्री महोदयांच्या या बनावट फेसबुक अकाऊंटवरून १५ हजार रूपयांची मागणी केली. यानंतर हा प्रकार समोर आला आहे. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या कार्यालयाकडून नारपोली पोलीस ठाण्यात सायबर गुन्ह्याअंतर्गत अज्ञाताविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.