सोशल मिडीया
बीड : बीड जिल्ह्यात महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटनांची मालिका सुरू असतानाच गेवराई तालुक्यात शिक्षक-विद्यार्थी नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनींचा शिक्षकानेच लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अविनाश ढेरे याला गेवराई पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याविरोधात पोक्सोसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मधल्या सुट्टीत आणि शाळा सुटल्यानंतर मुलींना थांबवत होता
पोलिसांच्या माहितीनुसार, अविनाश ढेरे हा गेवराई तालुक्यातील एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक आहे. चौथीच्या वर्गातील विद्यार्थिनींना तो मधल्या सुट्टीत तसेच शाळा सुटल्यानंतर वर्गात थांबवून घेत असल्याचा आरोप आहे. याचदरम्यान त्याने मुलींशी अयोग्य वर्तन करून त्यांचा लैंगिक छळ केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. हा प्रकार १२ ते १४ ऑक्टोबरदरम्यान घडल्याचे सांगण्यात येत आहे.
घरी परतल्यानंतर मुलीने आईला सांगितला प्रकार
या प्रकरणातील एका पीडित मुलीने घरी आल्यानंतर घडलेला प्रकार आईला सांगितला. सायंकाळी पाचच्या सुमारास घरी आलेली मुलगी अत्यंत घाबरलेली होती. तिच्या डोळ्यांत अश्रू होते. आईने विचारपूस केल्यानंतर तिने शाळेत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर संतप्त कुटुंबीयांनी थेट पोलिस ठाणे गाठून शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली.
शिक्षक पोलिसांच्या ताब्यात
तक्रारीनंतर गेवराई पोलिसांनी अविनाश ढेरे याच्याविरोधात पोक्सो कायद्यासह इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. शिक्षकाने विद्यार्थिनींसोबत केलेल्या कथित गैरवर्तनामुळे परिसरात संताप व्यक्त होत असून, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
Ans: जिल्हा परिषद शाळेतील चौथीच्या विद्यार्थिनींचा शिक्षकाने लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे.
Ans: आरोपीविरोधात पोक्सो कायद्यासह इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ans: हा प्रकार १२ ते १४ ऑक्टोबरदरम्यान घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.






