Gujarat Crime : रिफायनरी मॅनेजरची गोळ्या झाडून हत्या; 1.53 कोटींच्या सोने-चांदीच्या लुटीप्रकरणी 10 जणांना अटक, सौजन्य : आयएएनएस
गुजरातमधील (Gujarat Crime) राजकोट शहरात रिफायनरी मॅनेजरची हत्या करून सोने आणि चांदी लुटल्याप्रकरणी पोलिसांनी 10 जणांना अटक केली आहे. या आरोपींकडून चोरीला गेलेले सुमारे 1.53 कोटी रुपयांचे सोने आणि चांदी काही तासांतच जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली.
ही घटना 14 ऑक्टोबर रोजी रात्री आठच्या सुमारास राजकोटमधील थोराळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अजी जीआयडीसी मेन रोडवरील तन्वी एक्स्पोर्ट इंडिया लिमिटेडच्या रिफायनरीमध्ये घडली.
कंपनीचे मॅनेजर लालाजीभाई सरधरा हे सुमारे 946 ग्रॅम वजनाच्या शुद्ध सोन्याच्या लगडी आणि जवळपास दोन किलो शुद्ध चांदीची पावडर असलेली बॅग घेऊन जात होते. सोन्याची किंमत सुमारे 1.489 कोटी रुपये, तर चांदीच्या पावडरची किंमत 4.3 लाख रुपये होती. या मौल्यवान धातूंची एकूण किंमत 1.532 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले.
रिफायनरीतून बाहेर पडल्यानंतर सरधरा हे कंपनीजवळील शोरूममध्ये जाण्यासाठी दुचाकीवर बसण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी चार जण कारमधून तेथे आले. त्यापैकी दोघांनी कारमधून उतरून सरधरा यांच्या हातातील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला.
सरधरा आणि सुरक्षा रक्षक बावनजी पधियार यांनी प्रतिकार केला. यावेळी हल्लेखोरांपैकी एकाने सरधरा यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर आरोपी बॅग घेऊन पसार झाले. गंभीर जखमी झालेल्या सरधरा यांचा नंतर मृत्यू झाला.
घटनेनंतर राजकोट शहर गुन्हे शाखा, विशेष ऑपरेशन्स ग्रुप (एसओजी), स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी), झोन-1 आणि थोराळा पोलीस ठाण्याच्या पथकांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक निगराणीच्या मदतीने गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या कारचा शोध घेण्यात आला.
ही कार गुजरातबाहेरून आल्याचे समोर आल्यानंतर गुजरात पोलिसांनी राजस्थान पोलिसांशी संपर्क साधून विविध जिल्ह्यांना सतर्क केले. मिळालेल्या माहितीच्या आधारे राजस्थान पोलिसांनी सिरोही जिल्ह्यातील जनपूर सर्कल येथे कार अडवून चार जणांना अटक केली.
वाघोलीत तरुणावर टोळक्याचा हल्ला; मैत्रिणीसोबतचा वाद मिटवण्यासाठी बोलावले अन्…
चौकशीदरम्यान अन्य दोन आरोपी चोरीचा मुद्देमाल घेऊन दुसऱ्या कारमधून पसार झाल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर उदयपूर जिल्ह्यातील बडगाव परिसरात पोलिसांनी ही कार अडवली. पुढील तपासात कच्छ जिल्ह्यातील समाखियाळी येथूनही काही आरोपींना अटक करण्यात आली.
लुटलेल्या मौल्यवान धातूंच्या वाहतुकीबाबत माहिती पुरवल्याचा संशय असलेल्या एका व्यक्तीला राजकोटमधून अटक करण्यात आली. त्यामुळे अटक केलेल्या आरोपींची एकूण संख्या १० झाली.
पोलिसांनी आरोपींकडून सोन्याच्या लगडी, चांदीची पावडर, गुन्ह्यात वापरलेल्या दोन कार आणि आठ मोबाइल फोन जप्त केले आहेत. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 1 कोटी 57 लाख 65 हजार 500 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अश्विनी कुमार ऊर्फ लंकेश, अनुराग सिंह, विशाल सिंह, शिवम गुप्ता, वेदांत कांत ऊर्फ अमन, पवनकुमार, अरविंद ऊर्फ नीरज, शैलेश कुमार खरवार, अजीत कुमार पांडे आणि शिवम पांडे यांचा समावेश आहे. यातील बहुतांश आरोपी उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत, तर शैलेश कुमार हा राजकोटमध्ये राहत होता.
Crime News: ठाण्यात १७ वर्षीय मुलाची हत्या; मित्रांनी मृतदेह जाळून पोलीस चौकीजवळ पुरला…
पोलिसांच्या माहितीनुसार, काही आरोपींविरोधात यापूर्वीही विविध गुन्हे दाखल आहेत. शैलेश कुमार याच्याविरोधात हरियाणातील पलवल पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल आहे. अजीत कुमारला 2025 मध्ये चंदौली जिल्ह्यातील हत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात अटक झाली होती. अश्विनी कुमारलाही 2025 मध्ये हत्येचा प्रयत्न आणि 2018 मध्ये मारहाणीच्या दोन प्रकरणांत अटक झाली होती.
अनुराग सिंह यालाही उत्तर प्रदेशातील बहरियाबाद पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या सदोष मनुष्यवधाच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा पुढील तपास आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
Ans: गुजरातमधील राजकोट शहरातील अजी जीआयडीसी मेन रोडवरील तन्वी एक्स्पोर्ट इंडिया लिमिटेडच्या रिफायनरीमध्ये ही घटना घडली.
Ans: पोलिसांनी या प्रकरणात एकूण १० जणांना अटक केली आहे.
Ans: पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक निगराणी आणि गुजरात व राजस्थान पोलिसांमधील समन्वयाच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला.






