पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. हगवणे बंधुं म्हणजेच वैष्णवीचा पती शशांक हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांच्याकडे पिस्तुल असल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली होती. हगवणे बंधूंनी पुणे पोलिसांकडून घेतलेल्या पिस्तूल परवान्याच्या प्रकरणात नवीन माहिती समोर आल्यानंतर, त्यासंदर्भात चौकशीला गती मिळाली आहे. परवाना मिळवताना त्यांनी दिलेल्या पत्त्यांबाबत शंका उपस्थित झाल्यामुळे ही चौकशी केली जात आहे.
राजेंद्र हगवणे व त्यांचे कुटुंब मूळचे पुणे जिल्ह्यातील भूकुम येथील असून, सध्या ते बावधन परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांचा कायमस्वरूपी पत्ता हा पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. असे असतानाही पिस्तुल परवाना मिळवण्यासाठी त्यांनी पुण्यातील निवासी पत्ता दाखवला, असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. त्याचबरोबर निलेश चव्हाण यानेही पिस्तूल घेतल्याचे उघड झाले आहे. या दोघांनी वारजे आणि कोथरूड पोलीस ठाण्यांतर्गत परवान्यासाठी अर्ज केला होता. त्यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वास्तव्यास असल्याचा दाखला म्हणून भाडेकरार सादर केला होता, असे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
शशांक आणि सुशील हगवणे या दोघांनी एकाच वेळी स्वतःच्या सुरक्षेसाठी पिस्तूल परवाना का घेतला? त्यांना पिस्तुलाची काय गरज होती? आणि पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत असतानाही त्यांनी पुणे पोलीस आयुक्तालयातून परवाना कसा घेतला? अशा अनेक प्रश्नांनी चौकशी अधिक खोलात गेली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असून, चौकशीत बेकायदेशीर काही आढळल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हगवणे बंधूंनी व त्यांच्यासोबत नीलेश चव्हाण यांनी पुणे पोलीस आयुक्तालयातून घेतलेल्या पिस्तूल परवाना प्रकरणात चौकशी अधिक गंभीर वळणावर पोहोचली आहे. या तिघांनी पुण्यात वास्तव्य असल्याचा खोटा पुरावा दिल्याची शक्यता असून, पोलिसांनी त्यांची पिस्तूले ताब्यात घेतली आहेत. तसेच परवाने रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.