
‘मनःशांती मिळाली’ म्हणत पत्नीने पतीला संपवलं; पतीची हत्या अन् मृतदेहाची चिरफाड, काढलेले अवयव देवीला अर्पण करून तिला...
पोलिसांच्या चौकशीत विमलाने पतीच्या दारूच्या व्यसनामुळे त्रस्त असल्याचे सांगितल्याचे समोर आले आहे. राजेश दारूच्या नशेत घरी आल्यानंतर तिच्यासोबत वाद घालत आणि मारहाण करत असल्याचा आरोप आहे. पतीला दारूपासून दूर करण्यासाठी विमलाने यापूर्वी भूतबाधा उतरवण्याचे तसेच तंत्र-मंत्राचे उपाय केल्याचेही तपासात समोर आले आहे. मात्र, त्याचा काहीही परिणाम झाला नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
२१ ऑगस्ट रोजी राजेश घरी आल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर विमलाने त्याच्यावर हल्ला करून त्याची हत्या केल्याचा आरोप आहे. हत्येनंतर ती काही काळ मृतदेहाजवळ बसून होती. पोलिसांच्या तपासानुसार, तिने मृतदेहावर चाकूने वार करून काही अवयव काढल्याचे समोर आले आहे. विमला ही देवी कालीची पूजा करत असून अंधश्रद्धेच्या प्रभावाखाली असल्याचा पोलिसांचा दावा आहे. काढलेले अवयव देवीला अर्पण करून तिला ‘देव प्राप्त’ करायचा होता, असे तिने चौकशीत सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. हत्येनंतर पतीचे रक्त कपाळाला लावल्याचेही तपासात समोर आले असून, त्यानंतर आपल्याला मनःशांती मिळाल्याचे तिने सांगितल्याचा पोलिसांचा दावा आहे.
राजेशच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करताना त्याच्या शरीरावर गंभीर जखमा आढळून आल्या. पोटावर सुमारे ३७ सेंटीमीटर लांब आणि ३.५ सेंटीमीटर रुंद खोल जखम असल्याचे अहवालातून समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले तीन चाकू जप्त केले आहेत. दरम्यान, राजेशचे यापूर्वी दोन विवाह झाले होते. त्या विवाहांतूनही त्याला अपत्य नव्हते. त्यानंतर सुमारे दोन वर्षांपूर्वी त्याने विमलासोबत प्रेमविवाह केला होता. या विवाहातूनही त्यांना अपत्य नव्हते. प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.