iPhone डिलरने चोरलेले मोबाईल ग्राहकांना विकले, ग्राहकांची फसवणूक तर पोलीसही चक्रावले (फोटो सौजन्य-X)
तुम्ही आय फोन खरेदी केला आहे का? थोडे सावध रहा, कारण कल्याणमध्ये आय फोन विकणाऱ्या दोन नामांकित विक्रेत्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या मोबाईल विक्रत्यांनी ग्राहकांकडून पैसे घेऊन त्या ग्राहकांना खेरदीचे बिल दिले. मात्र नंतर धक्कादायक माहिती समोर आली की, डिलरने विकलेले मोबाईल एका मोठ्या कंपनीच्या गोदामातून चोरी केलेले होते. या प्रकरणात तीन जणांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. यापैकी डिलरची नावे दीपक चंचलानी आणि कमल हरचंदानी अशी आहेत. तर चोरट्याचे नाव फैय्याज शेख असे आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बाजारपेठ पोलिस करीत आहे.आत्तापर्यंत चार महागड्या आयफोनची माहिती समोर आली आहे.
कल्याण पश्चिमेतली लाल चौकी परिसरात फ्लीपकार्ड या कंपनीचे कार्यालय आहे. या कंपनीच्या कार्यालयातून महागडे आय फोन चोरीस गेले होते. कल्याणच्या बाजारपेठ पोलिस ठाण्यात या प्रकरणात तक्रार दाखल झाली. कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. पोलिसांनी या प्रकरणात काही आय फोन ट्रेस केले. आय फोन वापरणाऱ्यांना पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. आय फोन वापरणाऱ्या व्यक्तीकडून अशी माहिती मिळाली की, सर्वांनी हे मोबाईल दुकानातून खरेदी केले आहेत. त्याची खरेदी पावती त्यांच्याकडे आहे. त्याचे पैसेही विक्रेत्यांना दिले आहे. हे पाहून पोलीस देखील चक्रावले. या प्रकरणाचा तपास कल्याणचे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, बाजारपेठ पोलिस ठाण्याचे सुरेश सिंग गौड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी नवनाथ रुपवते यांनी तपास सुरु केला.
पोलिस पथकाने फ्लीपकार्ड कंपनीच्या कार्यालयातून आय फोन चाेरणारा चोरटा फैय्याज शेखला पकडले आहे. फैय्याज शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार फैय्याजने हे मोबाईल डिलरला विकले होते. त्यांची नावे समोर आली आहे. उल्हासनगरातील नामांकित ममता मोबाईल शा’पच्या दोन डिलरना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आत्तापर्यंत चार आय फोन ट्रेस केले आहेत. त्यापैकी दोन आय फोन हस्तगत केले आहे. आत्ता चोरीस गेलेले मोबाईल ज्यांचे आहेत. त्यांना परत मिळणार. मात्र हक्काचे पैसे देऊन ज्यांनी आय फोन खरेदी केला होता. त्यांचे काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकरणात डीलर विरोधर पोलिस आणखीन गुन्हे दाखल करतात का ? कारण डिलरने ग्राहकांची फसवणूक केली आहे. आत्तापर्यंत किती ग्राहक फसले गेले आहेत, याचा तपास पोलिस करीत आहेत.