नागपूर : सध्या देशात तणावाचे वातावरण निर्माण झाले असताना नागपूरमध्ये एका पत्रकारास देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. अटकेतील पत्रकार रेजाझ एम. शीबा सिद्दीक (वय २६) याच्यावर देशविरोधी कारवायांमध्ये सहभाग घेतल्याचा ठपका ठेवण्यात आला असून, पोलिसांनी त्यास अटक केली आहे. त्याच्यासोबत एका महिला सहकाऱीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेजाझ सिद्दीक केरळमधील एडप्पल्ली येथील रहिवासी असून तो ‘मकतूब मीडिया’ आणि ‘द ऑब्झर्व्हर पोस्ट’ या माध्यम संस्थांसोबत कार्यरत आहे. दिल्लीहून केरळला परतत असताना नागपूरमध्ये एका मित्राला भेटण्यासाठी थांबलेल्या रेजाझला, केंद्र सरकारच्या गुप्तचर यंत्रणांच्या देखरेखीखाली अटक करण्यात आली. या कारवाईत स्थानिक पोलिसांसह आयबी (इंटेलिजन्स ब्युरो) आणि एटीएस (दहशतवादविरोधी पथक) देखील सहभागी असल्याची माहिती मिळत आहे.
इस्लामाबाद ते कराची हादरले! भारताच्या INS विक्रांतची धमाकेदार एन्ट्री, पाकची हवा टाइट
रेजाझच्या विरोधात लकडगंज पोलिस ठाण्यात विविध गंभीर कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात भारत सरकारविरोधात युद्ध पुकारण्याची तयारी, समाजात तणाव निर्माण करणारी विधाने, दंगल घडवून आणण्यासाठी लोकांना भडकवणे आणि गुन्हेगारी स्वरूपाच्या धमक्या देणे यांचा समावेश आहे.
रेजाझ याने ३० एप्रिल रोजी कोची (केरळ) येथे आपल्या समर्थकांसह निदर्शने केली होती. त्या वेळी स्थानिक पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याची माहितीही समोर आली आहे. नागपूरमध्ये अटक केल्यानंतर त्याच्याकडून आणि त्याच्या सहकाऱ्यांकडून काही संशयास्पद कागदपत्रे, साहित्य आणि छायाचित्रे जप्त करण्यात आली आहेत. शहर पोलिसांकडून या प्रकरणावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नसली तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही कारवाई देशाच्या सुरक्षेशी संबंधित असल्याचे नमूद केले आहे.