सौजन्य फोटो - सोशल मिडीया
सातारा जिल्ह्यातील कराड शहराजवळ पुणे-बेंगलोर महामार्गावरील नव्या सहापदरी उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला. कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिराचे दर्शन घेऊन स्कॉर्पिओ गाडीने गावाकडे परतणाऱ्या सात तरुणांच्या वाहनाची ट्रकला मागून धडक बसली. या अपघातात चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले. काही दिवसांपूर्वीच वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आलेल्या या नव्या उड्डाणपुलावरील हा पहिलाच अत्यंत भीषण अपघात ठरला आहे.
कातरखटाव (ता. खटाव) येथील काही तरुण दसऱ्यानिमित्त कोल्हापूर येथील आई महालक्ष्मीच्या दर्शनासाठी स्कॉर्पिओने गेले होते. दर्शन घेतल्यानंतर ते रात्री गावाकडे परतत होते. रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास कराड शहराजवळ पुणे-बेंगलोर महामार्गावरील नव्या सहापदरी उड्डाणपुलावर त्यांच्या स्कॉर्पिओची ट्रकला मागून जोरदार धडक बसली. धडक एवढी भीषण होती की स्कॉर्पिओचा अक्षरशः चुराडा झाला. या दुर्घटनेत चालक तेजस देशमुख (२५), सागर निंबाळकर (२३), सुयश चिंचकर (२०) आणि रोहित धोत्रे (२१) यांचा जागीच मृत्यू झाला. तर ऋतुराज दुबळे (२१), शंतनू शिंगाडे (२०) आणि अमन तांबोळी (२३) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातातील सर्व तरुण हे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कातरखटाव गावचे रहिवासी आहेत. एकाच गावातील चार तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. मृतांच्या कुटुंबीयांवरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अपघाताची माहिती मिळताच कराडच्या डीवायएसपी राजश्री पाटील, कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, कराड वाहतूक शाखेचे संदीप साळुंखे, संग्राम पाटील, अमृत बाबर, दस्तगीर आगा, राहुल कदम आणि सचिन देवकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांनीही मदतकार्यात सहभाग घेतला. पोलिस आणि नागरिकांनी तातडीने जखमींना रुग्णालयात दाखल केले. तसेच अपघातामुळे विस्कळीत झालेली महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. या प्रकरणी कराड पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
Ans: पुणे-बेंगलोर महामार्गावरील नव्या सहापदरी उड्डाणपुलावर अपघात झाला.
Ans: या अपघातात चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला.
Ans: कोल्हापूरहून महालक्ष्मीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या स्कॉर्पिओची ट्रकला मागून जोरदार धडक बसली.






