
लातूर: लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी काल शनिवारी रात्री साडे अकराच्या सुमारास शासकीय निवासस्थानी स्वतःवर रिव्हॉल्वर मधून गोळ्या झाडून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यातून एक गोळी त्यांच्या डोक्यातून आरपार निघून गेली असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सह्याद्री हॉस्पिटल सूत्रांनी सांगितले. ही घटना रात्री साडे अकराच्या सुमारास घडली. रात्री जेवण करून आयुक्त मनोहरे स्वतःच्या खोलीत झोपण्यासाठी गेल्यानंतर झाडलेल्या गोळ्यांचा आवाज ऐकून सुरक्षारक्षक धावत आले.
आयुक्त त्यावेळी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यानंतर त्यांना तातडीने रात्री बारा वाजेच्या सुमारास डॉ. हनुमंत किनीकर यांच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले.यासंदर्भात नवराष्ट्रशी बोलताना डॉ. किनीकर म्हणाले, हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर रात्री दोनच्या सुमारास त्यांना ऑपरेशन थेटर मध्ये नेण्यात आले. पहाटे सहा वाजण्याच्या दरम्यान त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांना वाचविण्याची शर्तीचे प्रयत्न आम्ही करीत आहोत.
दरम्यान, दरम्यान पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी रात्री हॉस्पिटलला भेट देऊन माहिती घेतली. आयुक्त मनोहरे यांचे शासकीय निवासस्थान आणि हॉस्पिटल परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.