फेसबुक लाईव्ह करत एकाचा आत्महत्येचा प्रयत्न; पत्नीने केलं धक्कादायक विधान
बंगळुरू : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. असे असताना आता कर्नाटकातील एका व्यक्तीने कौटुंबिक वादातून त्रस्त होऊन फेसबुक लाईव्हवर आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना बंगळुरूच्या जयनगर पोलीस स्टेशन परिसरात घडली.
सलमान पाशा असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. तो हायड्रॉलिक मेकॅनिक आहे आणि नुकताच कुवेतहून भारतात परतला आहे. त्याने चार वर्षांपूर्वी सय्यद निखत फिरदौसशी लग्न केले होते. लग्नाच्या पहिल्या दोन वर्षात सर्व काही सामान्य होते. जेव्हा सलमान परदेशात गेला आणि त्याची पत्नी गर्भवती होती, तेव्हापासूनच या दोघांमध्ये भांडण सुरू झाले. पतीने त्याच्या पत्नीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. या वादात, सलमानची पत्नी तिच्या आई-वडिलांच्या घरी गेली आणि त्यानंतर या दोघांमधील वाद आणखीन वाढला.
हेदेखील वाचा : कारागृहातच कैद्याची आत्महत्या; लोखंडी गजाला जोरदार धडक दिली अन् जखमी होताच…
दरम्यान, पत्नी फिरदौस आणि तिच्या कुटुंबाने सलमानवर मानसिक दबाव आणला आणि पैशांची मागणी केली, असा आरोप सलमानकडून करण्यात आला. पत्नीचे तुमकुर जिल्हाध्यक्ष सय्यद बुरहानुद्दीन यांच्याशी प्रेमसंबंध असल्याचा संशय पती सलमानला आहे. त्यातच फिरदौसने सलमानला त्यांच्या दोन मुलांना भेटूही दिले नसल्याचा आरोप करण्यात आला. अखेर या सर्वाला कंटाळून सलमानने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्येचा प्रयत्न केला.
सलमानच्या पत्नीने फेटाळले आरोप
दुसरीकडे, सलमानच्या पत्नीने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ‘सलमानने यापूर्वी साबणाचे पाणी पिण्याचे नाटक केले. त्याने मला अॅसिड टाकून पेटवण्याची धमकी दिली होती. मी आधीच पोलिसांत तक्रार दाखल केली होती. आता तो सहानुभूती मिळवण्यासाठी हे करत आहे’, असा दावा सलमानच्या पत्नीने केला.
कारागृहात कैद्याची आत्महत्या
दुसऱ्या एका घटनेत, कारागृहात शिक्षा भोगत असताना कैद्याने आत्महत्या केल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. त्यातच आता परंडा येथे एका खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा लागलेल्या एका कैद्याची रवानगी हसूल कारागृहात करण्यात आली होती. कारागृहातील दीड महिन्याच्या कालावधीत कैद्याने लोखंडी गजाला जोरदार धडक घेऊन स्वतःला जखमी करून घेतले होती. या कैद्यांवर उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.