जळगाव : देशभरात धुळवडीचा सण साजरा होत असताना जळगावातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील बोदवड रेल्वे स्थानकाच्या जवळ सकाळी 4.30 च्या सुमारास मुंबई-अमरावती एक्सप्रेस समोर धान्याने भरलेला ट्रक आल्याने मोठा अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, संपूर्ण ट्रकचा चक्काचूर झाल आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, बोदवड नाढगावजवळ रेल्वे गेट तोडून एक धान्याने भरलेला एक ट्रक आधीपासून अडकून पडला होता. पण रेल्वेचालकाने दाखवलेल्या सतर्कतेमुळे रेल्वेचा स्पीड कमी होता.जळगाव जिल्ह्यातील बोदवड रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात घडला. रेल्वे क्रॉसिंग गेट तोडून धान्याने भरलेला ट्रक थेट ट्रॅकवर आल्यामुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. त्याच वेळी मुंबई-अमरावती एक्सप्रेस त्या मार्गावरून जात होती आणि ट्रकला जोरदार धडक बसली. मात्र, रेल्वेचा वेग कमी असल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे.
सध्या प्रशासनाकडून ट्रॅकवर अडकलेला ट्रक हटवण्याचे काम सुरू आहे. मोठ्या संख्येने रेल्वे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित आहेत. रेल्वे अधिकारी संपूर्ण परिस्थितीची तपासणी करत असून, अपघातामुळे ट्रॅकला झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला जात आहे. ट्रकमधील संपूर्ण माल ट्रॅकवर विखुरल्याचे दिसून आले. बचावकार्यासाठी स्थानिक नागरिकही मोठ्या प्रमाणात पुढे सरसावले. हा अपघात भल्या पहाटे घडला असून, त्यावेळी मोठा आवाज झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.