सौजन्य फोटो - सोशल मिडीया
नालासोपारा : नालासोपारा पूर्वेकडील इम्पेरियल हाइट्स इमारतीत मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. आगीमुळे इमारतीत मोठ्या प्रमाणात धूर पसरला. या दुर्घटनेत फाल्गुनी शाह (५०) आणि अश्विनी पारकर (५०) या दोन महिलांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सहा जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. आग लागल्यानंतर इमारतीतील अनेक रहिवासी जीव वाचवण्यासाठी खाली धावले. मात्र, वरच्या मजल्यांवरील काही नागरिक अडकून पडले. सातव्या, नवव्या, बाराव्या, तेराव्या आणि चौदाव्या मजल्यांवरील नागरिकांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना मोठी शर्थ करावी लागली. सुमारे २० ते २५ रहिवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली.
आगीच्या धुरामुळे परिस्थिती गंभीर झाली होती. मदतीसाठी नागरिक ‘हेल्प… हेल्प…’ अशा आर्त हाका देत होते. दरवाजात अडकलेल्या १४ वर्षीय मुलीला एका पोलिस कर्मचाऱ्याने दरवाजा तोडून बाहेर काढले. स्वतःचा जीव धोक्यात घालत त्याने मुलीला खांद्यावर घेत सुरक्षित ठिकाणी आणले. दरम्यान, इमारतीच्या बाहेरील छोट्या जागेचा आधार घेत चार जण तब्बल ४० ते ४५ मिनिटे मदतीची प्रतीक्षा करत होते. अखेर मोठ्या क्रेनच्या मदतीने त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली.
इमारतीच्या आजूबाजूला जागा कमी असल्याने अग्निशमन दलाच्या वाहनांना आणि मोठ्या लॅडर मशीनला इमारतीजवळ पोहोचताना अडथळे निर्माण झाले. त्यामुळे बचावकार्य अधिक आव्हानात्मक ठरले. अतिरिक्त मदतीसाठी मीरा-भाईंदर येथूनही अग्निशमन दलाच्या गाड्या मागवण्यात आल्या. या दुर्घटनेनंतर टोलेजंग इमारतींच्या अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. इमारतीला परवानगी देताना अग्निशमन वाहनांच्या हालचालींसाठी पुरेशी जागा ठेवण्यात आली होती का? इमारतीतील अग्निशमन यंत्रणा कार्यरत होती का? नियमित फायर ऑडिट झाले होते का, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शॉर्टसर्किटचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला असला, तरी अधिकृत तपासानंतरच आगीचे कारण स्पष्ट होणार आहे.






