संग्रहित फोटो
एका व्यक्तीने मुंबईहून ५० लाख रुपयांची रोकड आणली होती. पुण्यात आल्यानंतर त्याने पुनावळे येथे आपली कार उभी केली. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी कारमधील रोकड लंपास केली. मात्र, कारची कोणतीही तोडफोड झालेली नसल्याने पोलिसांना सुरुवातीपासूनच चोरीबाबत संशय होता. तपासात बनावट चावीच्या साहाय्याने कार उघडून रोकड चोरण्यात आल्याचे समोर आले. त्यामुळे ही अचानक झालेली चोरी नसून रोकड आणली जात असल्याची माहिती असलेल्या व्यक्तीने पाळत ठेवून हा डाव आखल्याचा संशय बळावला.
तपास पुढे जात असताना पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. ही चोरी बाहेरील व्यक्तीने नव्हे, तर फिर्यादीसोबत मुंबईला ५० लाखांची रोकड आणण्यासाठी गेलेल्या व्यक्तीनेच केल्याचे निष्पन्न झाले. त्याने आपल्या एका साथीदाराच्या मदतीने चोरीचा कट रचला होता. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेचे युनिट दोन, मालमत्ता विरोधी पथक आणि रावेत पोलिसांनी संयुक्तपणे तपास सुरू केला. पोलिसांनी अवघ्या आठ तासांत दोन्ही संशयितांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीला गेलेली संपूर्ण ५० लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. मोठी रक्कम कारमध्ये असल्याची माहिती असलेल्या व्यक्तीनेच साथीदाराच्या मदतीने चोरी केल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.






