अंमली पदार्थांनी भरलेली गोणी अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर सापडल्याने एकत खळबळ उडाली आहे. मुरुड पोलीस ठाणे हद्दीतील काशीद समुद्रकिनारी 55 लाख 74 हजार रुपये किमतीचे 11.148 किलो वजनाचे चरस सापडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 31 जुलै 2025 रोजी सायंकाळी 5:30 च्या सुमारास गुप्त बातमीदाराकडून मुरुड पोलिसांना काशीद समुद्रकिनाऱ्यावर संशयास्पद प्लास्टिक गोणी असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे मुरुड पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी खात्री केली असता, त्यांना प्लास्टिक गोणीमध्ये चरस सदृश्य अंमली पदार्थ आढळून आला.
पंचनामा करून पोलिसांनी हा अंमली पदार्थ जप्त केला. त्याचे एकूण वजन 11.148 किलो असून त्याची किंमत 55,74,000/- रुपये आहे. याप्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा रजि.नं 50/2025, एन.डी.पी.एस कायदा 1985 च्या कलम 8 (क), 20 (ब) (क), 22 (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अदित शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती प्रतीक्षा खेतमाळीस, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, मुरुड पोलीस ठाणे, पोउनि श्री. अविनाश पाटील, पोह जनार्दन गामिले, पोह हरी मेंगाळ, पोशी मकरंद पाटील, पोशी निखिल सुते, पोशी कैलास निमसे, पोशी संतोष मराडे, पोशी सुमित उकाडे यांनी केली आहे.