डिजिटल अरेस्टची पुन्हा घटना; मनी लाँड्रिंगमध्ये अडकवण्याची धमकी देत 71 लाख लुटले (File Photo)
आरोपींनी फिर्यादीशी संपर्क साधून ‘काश्मीर केस जेके ९५२७’ मधील दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असल्याचे सांगितले. तसेच, त्यांच्याकडे फिर्यादीचे आधारकार्ड मिळून आले असून, त्याद्वारे फिर्यादीचे एचडीएफसी बँकेत खाते उघडून ७० कोटी रुपयांची मनी लॉड्रिंग केल्याचा बनाव रचण्यात आला.
सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. यात मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधणारी सीमा रॉय (व्हॉट्सअॅप क्र. ९१ ७९०२०८४५१७ व ९१ ९३७१४२९८०७), तसेच विक्रम सिंग व राकेश अग्रवाल या नावांचा समावेश आहे. याशिवाय, सिग्नल अॅपद्वारे संपर्क साधणारे अनोळखी इसम आणि फसवणुकीची रक्कम वळती करण्यासाठी वापरण्यात आलेल्या तीन खासगी बँकांच्या खातेधारकांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सायबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे करत आहेत.
बँक खात्यांवर रक्कम भरण्यास भाग पाडले
फिर्यादीला मालमत्ता जप्त करण्याची आणि तात्काळ अटक करण्याची भीती दाखवून आरोपींनी त्यांच्याकडील पैशांची चौकशी करण्याच्या बहाण्याने वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण ७१ लाख रुपयांची रक्कम भरण्यास भाग पाडले. आपली मोठी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
सायबर भामट्यांचा बनाव आणि फसवणूक
धमकीचा विषय : काश्मीर प्रकरणातील दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याचे भासवून ७० कोटींच्या मनी लॉड्रिंगचा खोटा आरोप. फसवणुकीची रक्कमः एकूण ७१ लाख रुपये विविध खात्यांवर जमा करून घेतले.
वापरलेली खाती : अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक आणि कॅनरा बँक. संशयित नावेः सीमा रॉय, विक्रम सिंग आणि राकेश अग्रवाल.






