सौजन्य फोटो - सोशल मिडीया
सोलापूर : सांगोला तालुक्यातील एका ७५ वर्षीय निपुत्रिक वृद्ध शेतकरी दाम्पत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दीपक साळुंखे आणि त्यांचे पुत्र सूर्यादित्य साळुंखे यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आपली सुमारे २० एकर शेतजमीन परस्पर मुलाच्या आणि त्यानंतर एका ट्रस्टच्या नावावर करण्यात आल्याचा आरोप या दाम्पत्याने केला आहे. तसेच तक्रार केल्यानंतर आपल्या जीविताला धोका निर्माण झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित वृद्ध दाम्पत्याला अपत्य नाही. त्यांनी आपली सुमारे २० एकर शेतजमीन कसण्यासाठी माजी आमदार दीपक साळुंखे यांना बटाईने दिली होती. मात्र, विश्वासाचा गैरफायदा घेत ही जमीन परस्पर सूर्यादित्य साळुंखे यांच्या नावावर करण्यात आल्याचा आरोप वृद्ध दाम्पत्याने केला आहे. आपल्या संमतीशिवाय जमीन नावावर करण्यात आल्याचा दावा करत दाम्पत्याने पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केला.
वृद्ध दाम्पत्याच्या तक्रारीनंतर प्रकरण अंगलट येण्याच्या शक्यतेने संबंधित जमीन एका ट्रस्टच्या नावावर वर्ग करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ज्या ट्रस्टच्या नावावर जमीन करण्यात आली, त्या ट्रस्टमध्ये सूर्यादित्य साळुंखे यांचाही सहभाग असल्याचा दावा दाम्पत्याने केला आहे. या सर्व व्यवहाराची चौकशी करून आपली जमीन परत मिळवून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
माजी आमदार आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात तक्रार केल्यानंतर आपल्यावर दबाव येत असून, जीविताला धोका निर्माण झाल्याचा आरोप वृद्ध दाम्पत्याने केला आहे. उतारवयात हक्काची जमीन गमावण्याची वेळ आल्याने ते हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर वृद्ध दाम्पत्याने थेट व्हीलचेअरवरून पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेत आपली व्यथा मांडली. राज्याचे मुख्यमंत्री आणि प्रशासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून आपल्याला न्याय मिळवून द्यावा, अशी आर्त विनंती त्यांनी केली आहे. या आरोपांमुळे सांगोला तालुक्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, प्रकरणाची सत्यता संबंधित कागदपत्रे आणि पोलिसांच्या तपासातून स्पष्ट होणार आहे.






