सौजन्य फोटो - सोशल मिडीया
पुणे : पेट्रोल पंप व्यवसायात ५० टक्के भागीदारी आणि भरघोस परताव्याचे आमिष दाखवून ६९ वर्षीय ज्येष्ठ व्यावसायिकाची तब्बल २ कोटी ४७ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार हडपसरमध्ये समोर आला आहे. सुरुवातीला काही काळ नफ्याची रक्कम देऊन विश्वास संपादन केल्यानंतर आरोपींनी मोठी रक्कम हडपल्याचा आरोप आहे. याप्रकरणी काळेपडळ पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मोहन दगडू मोरे (वय ६९, रा. श्रीराम चौक, हांडेवाडी रोड, हडपसर) यांनी याबाबत काळेपडळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आनंद मदनलाल लाहोटी (रा. रुणवाल सेहगल सोसायटी, हांडेवाडी रोड) आणि कालिदास विजय मगर (रा. मगरपट्टा सिटी, हडपसर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, आनंद लाहोटी आणि कालिदास मगर यांनी सय्यदनगर (हडपसर) आणि वैजापूर (छत्रपती संभाजीनगर) येथील ‘मगर फ्यूल स्टेशन’ या पेट्रोल पंपाचे आपण भागीदार असल्याचे मोरे यांना सांगितले. या व्यवसायात ५० टक्के शेअर्सची गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवण्यात आले.
हेही वाचा: Crime News: प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचा आरोप; ७०-८० तरुणींच्या दाव्याने नालासोपारा हादरला
आरोपींच्या आश्वासनावर विश्वास ठेवून मोरे यांनी स्वतःचे घर गहाण ठेवले. तसेच घरातील सोन्याचे दागिने मोडून पैसे उभे केले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने तब्बल २ कोटी ४७ लाख १५ हजार रुपये आरोपींच्या तसेच पेट्रोल पंपाशी संबंधित खात्यांमध्ये जमा केल्याचे तक्रारीत नमूद आहे. फसवणुकीचा संशय येऊ नये यासाठी आरोपींनी सुरुवातीला काही महिने मोरे यांना नफ्यापोटी ठराविक रक्कम परतावा म्हणून दिली. त्यामुळे त्यांचा आरोपींवरील विश्वास आणखी वाढला.
मोठी रक्कम हातात आल्यानंतर आरोपींनी मात्र मूळ मुद्दल आणि लाभांश देण्यास टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. वारंवार मागणी करूनही पैसे परत न मिळाल्याने मोरे यांनी चौकशी केली. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. अखेर त्यांनी काळेपडळ पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार आनंद लाहोटी आणि कालिदास मगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल निंबाळकर करीत आहेत.






