Mumbai Political News: दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये ते एका बेडवर बसलेले दिसत आहे. तर त्यांच्या समोर असलेल्या एका बॅगेमध्ये रोकड असल्याचेही दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. हा व्हिडिओ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर शेअर केला.
या प्रकारानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. “शिरसाट यांच्या बॅगेतून पैसे सापडणे ही काही पहिली वेळ नाही,” असे म्हणत त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. यात त्यांनी शिंदे गट आणि भाजपमधील काही नेत्यांकडे याआधीही रोख रक्कम सापडल्याच्या घटना तारखेसह उघड केल्या आहेत. या व्हिडिओवरून दोन्ही शिवसेना गटांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले असून प्रकरण आता चांगलेच तापले आहे.
“कालच्या कॅश कांड नंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
खरंतर संजय शिरसाट कडे कॅश आढळून आली ही काही पहिली घटना नाही.
याआधी
– 20 नोव्हेंबर 2023 ला भाजपाचे तात्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मकाऊमध्ये कसीनो मध्ये पैशांची लय लूट करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
– 22 ऑक्टोबर 2024 ला पुण्याजवळच्या शिरवळ येथील टोल नाक्यावर शहाजी बापू पाटील यांच्या निकटवर्तीयाच्या गाडीमध्ये पाच कोटीची रक्कम सापडली.
_ 19 नोव्हेंबर 2024 ला विरारच्या विवांता हॉटेलमध्ये भाजपाचे नेते विनोद तावडे हे पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ बहुजन विकास आघाडीने प्रकाशित केला.
–28 मे 2025 ला अर्जुन खोतकर यांच्या पीए कडे धुळ्यामध्ये साडेपाच कोटींची कॅश सापडली.
–नाशिक येथे शिक्षक मतदार संघाचे एसंशी चे उमेदवार किशोर दराडे यांच्याकडून कॅश आणि इतर वस्तू वाटप करताना चे व्हिडिओ व्हायरल झाले.
–काल संजय शिरसाठ चा भल्या मोठ्या कॅश सह व्हिडिओ व्हायरल झाला. यावर स्पष्टीकरण देताना शिरसाटने माझंच घर आहे माझीच बॅग आहे आणि व्हिडिओ माझ्या जवळच्या माणसाने काढलाय पण कोणी काढलाय हे माहीत नाही असे म्हटले. ( एवढा पैसा कमावणाऱ्या माणसाला एक विश्वासू माणूस कमावता येत नसेल तर त्याचे जगणे व्यर्थ आहे. असो हा फारच तात्विक मुद्दा आहे.)
याच पद्धतीने छोट्या-मोठ्या रकमा सह एसंशी चे आणि भाजप चे अनेक कार्यकर्ते यांचे व्हिडिओ व्हायरल झाले.
पण या सगळ्यांमध्ये समान धागा एक आहे की यातल्या एकाही माणसावर कुठल्याही प्रकारची केस झाली नाही. कारवाई केली नाही. किंवा यांची कसलीही चौकशी झाली नाही…!
यांच्यापैकी कुणाच्याही घरावर बुलडोझर चालवला गेला नाही..!!
मात्र आष्टी मध्ये सतीश उर्फ खोक्या भोसले या पारधी समाजाच्या कार्यकर्त्याची पाच दहा लाख रुपये फार फार तर गाडीमध्ये ठेवून केलेला reel व्हायरल झाला आणि खोक्या भोसले वर कारवाई झाली… आणि हो खोक्या भोसले च्या घरावर बुलडोझर चालून त्याच्या संपूर्ण नातेवाईकांना रस्त्यावर आणले..!!!
खोक्या भोसले हा भटक्या विमुक्तातील पारधी समाजातला आहे तूर्तास इतकेच.. बाय द वे सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणांमध्ये आरोपी असणाऱ्या सात पोलिसांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे उच्च न्यायालयाने आदेश दिले होते त्याची मुदत संपलेली आहे मात्र पोलिसांवर गुन्हे दाखल झाले नाहीत…
सोमनाथ सूर्यवंशी हा भटक्या विमुक्तातील वडार आहे.