पुणे: पुण्यात एक अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. भूतानमधून पुण्यात शिक्षण आणि नोकरीसाठी आलेल्या २७ वर्षीय परदेशी महिलेवर सात जणांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही महिला २०२० पासून पुण्यात वास्तव्यास होती. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पदाधिकारी शंतनु कुकडे आणि त्याचे सहा साथीदार आरोपी असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी या सर्व आरोपींना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी पदाधिकारी शंतनु कुकडे याच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल झाले होते. काही दिवसांपूर्वी दोन तरुणींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणीने समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत शंतनु कुकडे यांच्यासह ऋषिकेश नवले, जालिंदर बडदे, उमेश शहाणे, प्रतीक शिंदे, ॲड. विपीन बिडकर, सागर रासगे, अविनाश सूर्यवंशी आणि मुद्दासीन मेनन अशा एकूण नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी यापैकी सात आरोपींना अटक करण्यात आली असून इतर दोघांचा शोध सुरू आहे.
Dinanath Mangeshkar Hospital Update: दीनानाथला महापालिकेचा पहिला दणका
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरूण मूळची भूतानमधील असून ती २०२० मध्ये भारतात, बोध गया येथे आली होती. पुढे शिक्षण व नोकरीच्या निमित्ताने तिची ओळख आरोपी ऋषिकेश नवले याच्याशी झाली. ऋषिकेशने तिची ओळख आपल्या मित्राशी – राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी पदाधिकाऱ्याशी, शांतनु कुकडे यांच्याशी करून दिली. कुकडे याने पीडित महिलेला पुण्यात वास्तव्यासाठी एक घर उपलब्ध करून दिले आणि तिच्या शिक्षणासाठी आर्थिक मदतही केली. मात्र, याच विश्वासाचा गैरफायदा घेत त्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात वास्तव्यास असताना शंतनु कुकडे याने पीडित भूतानी तरूणीची ओळख आपल्या इतर मित्रांशी करून दिली. पार्टीच्या निमित्ताने कुकडे आणि त्याचे मित्र अनेकदा पीडितेच्या निवासस्थानी येत-जात होते. या आरोपींपैकी एक डी.जे. म्हणून काम करतो, तर दुसरा आरोपी पेशाने वकील आहे. या आरोपींनी ओळखीचा आणि मैत्रीचा गैरफायदा घेत, पीडितेला लोणावळा, रायगड आणि पानशेत येथे पार्टीसाठी नेले आणि तिथे तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले, असा आरोप पीडित तरूणीकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत काही आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.