आंध्र प्रदेशातील नंदयाल जिल्ह्यात तिसरीत शिकणाऱ्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी मुलीच्या शाळेतील तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांना आरोपी म्हणून पकडले आहे. विद्यार्थ्यांनी सामूहिक बलात्कारानंतर तिची हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह कालव्यात फेकून दिला. मुलीचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. मुलगी ८ वर्षांची होती. आरोपी असलेल्या दोन मुलांचे वय १२ वर्षे आहे. हे दोघे सहावीत शिकतात. तिसरा आरोपी १३ वर्षांचा असून तो सातवीत शिकतो.
खेळण्याच्या बहाण्याने निर्जनस्थळी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी दिं. ७ जुलै सायंकाळी घडल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेच्या वेळी मुलगी उद्यानात खेळत होती. त्यावेळी, आरोपी विद्यार्थ्यांनी तिला खेळण्याच्या बहाण्याने निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. मुलगी ही घटना पालकांना सांगेल या भीतीने आरोपी मुलांनी तिचा खून करून मृतदेह जवळच्या कालव्यात फेकून दिला आणि घटनास्थळावरून पळ काढला.
आरोपींना अटक, शोधमोहिम अजूनही आहे सुरु
कृष्णा नदीच्या मागील भागात पोलिसांनी शोधमोहीम राबवली. ही मुलगी ७ जुलैपासून बेपत्ता असल्याचे पोलिसांनी सांगितले. ती घराजवळील उद्यानात खेळण्यासाठी गेली होती, मात्र बराच वेळ होऊनही ती परतली नाही. म्हणून पालकांनी तक्रार दाखल केली होती. यानंतर ९ जुलै रोजी कुत्र्यांची मदत घेण्यात आली. यावेळी गावात राहणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांचे असामान्य वर्तन दिसून आले. तीन आरोपींपैकी एका मुलाने गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर आणखी दोघांनाही अटक करण्यात आली.
पावसामुळे मृतदेह वाहून गेला असू शकतो त्यामुले मृतदेह बाहेर काढण्यासाठी कालव्याच्या काठावर शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे. एसपी रघुवीर रेड्डी यांनी सांगितले की, जोपर्यंत मुलीचा मृतदेह मिळत नाही तोपर्यंत शोध मोहीम सुरूच राहणार आहे. यासाठी एसडीआरएफची टीमही तैनात करण्यात आली आहे. स्थानिक खासदार, आमदार ही त्या ठिकाणी पोहचले असून त्यांनी पोलिसांना आरोपींवर कडक कारवाई करण्याचे सांगितले आहे.