लाकडी दांड्याने वडिलांची हत्या
खामगाव : दारू पिऊन बाप आईला दररोज त्रास देऊन मारहाण करत होता. आईला दररोज होणाऱ्या मारहाणीचा राग अनावर झाल्याने संतप्त मुलाने आपल्या बापालाच लाकडी दांड्याने मारहाण करून हत्या केली. ही घटना तालुक्यातील लोणी गुरव येथे बुधवारी (दि. 30) सकाळच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
आरोपी मुलगा धनंजय हिवराळे (वय 25, रा. लोणी गुरव, ता. खामगाव) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गोरख हिवराळे (वय 55, रा. लोणी गुरव, ता. खामगाव) असे मृताचे नाव आहे. गोरख याला दारूचे व्यसन होते. दारू पिऊन तो दररोज पत्नीशी वाद घालत होता. अशातच मारहाणदेखील करत होता. हा प्रकार नित्यनेमाने सुरू होता. त्यामुळे आपल्या जन्मदात्या आईला दारूडा बाप दररोज शिवीगाळ करून मारहाण करत असल्याने धनंजयचा संताप अनावर होत गेला.
अशातही अनेक दिवस त्याने हा त्रास सहन केला. अखेर त्याच्या संयमाचा बांध फुटला आणि त्याने बापाला कायमचे संपवायचे मनोमन ठरवले. यादरम्यान मंगळवारी (दि. 29) रात्री उशिरा धनंजय हिवराळे याने दारूच्या नशेत झोपलेल्या आपल्या बापावर जाड लाकडी दांड्याने प्रहार केले. या मारहाणीत गोरख याचा मृत्यू झाला. दरम्यान, बुधवारी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. गोरख हिवराळे हा राहत्या घरात अंथरुणावर मृतावस्थेत आढळून आला.
वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल
या घटनेची माहिती लोणी गुरव येथील पोलिस पाटील व अन्य नागरिकांनी खामगाव ग्रामीण पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलिस ठाण्याचे ठाणेदार व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिस अधीक्षक विश्व पानसरे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा यांना खामगाव ग्रामीणच्या ठाणेदारांनी घटनेची प्राथमिक माहिती दिली. त्यापाठोपाठ उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील हे आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसाह लोणी गुरव गावात दाखल झाले होते. घटनेनंतर आरोपी मुलाला ताब्यात घेण्यात आले असून, त्याची चौकशी केली जात आहे.