फोटो सौजन्य- सोशल मीडिया
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वराळे गावच्या हद्दीत गुरुवारी रात्री एक टेम्पो भरधाव वेगाने जात होता. अपघात टाळण्यासाठी त्याला हळू चालवण्यास सांगण्यात आले. मात्र, याच कारणावरून दोन्ही बाजूंच्या लोकांमध्ये वाद सुरू झाला. काही वेळातच वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. दोन्ही गटांनी लाकडी दांडक्यांसह मिळेल त्या वस्तूंचा वापर करून एकमेकांवर हल्ला केला. या घटनेत दोन्ही बाजूंचे काही जण जखमी झाले.
रणजित संतोष हिवाळे (वय ३०, रा. वराळे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी समाधान विलास गायकवाड (वय २८) आणि सचिन विलास गायकवाड (वय ३१) यांना अटक केली आहे. त्यांच्यासह विलास पांडुरंग गायकवाड यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यात एका तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन नऊ टाके पडले. दरम्यान, विलास गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रणजित हिवाळे, अजय रोहिदास आणि इतर दोन अनोळखी व्यक्तींनी गायकवाड कुटुंबीयांवर हल्ला केला. रणजित हिवाळे याने लाकडी दांडक्याने केलेल्या प्रहारामुळे विलास गायकवाड यांच्या डाव्या हाताचे हाड मोडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. किरकोळ कारणावरून वाद वाढवून कायदा हातात घेऊ नये आणि परिसरात शांतता राखावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.






