
Tamhini Ghat Accident:
पुण्यातील कोंढवे-धावडे परिसरातील प्रथम चव्हाण (वय २२), पुनित शेट्टी (वय २०), साहील बोटे (वय २४), श्री कोळी (वय १८), ओंकार कोळी (वय १८) व शिवा माने (वय १९) या तरुणांचा ताम्हीणी घाटात थार गाडी खोल दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी उघडकीस आली. या घटनेने कोंढवे-धावडे परिसरासह पुर्ण पुण्यावर शोककळा पसरली आहे.
सहा मित्रांपैकी श्री कोळी आणि शिवा माने हे कुटूंबातील एकुलते एक मुल. सर्वांच्या कुटूंबाची परिस्थिती तशी, बेताचीच होती. कोणाचे आई-वडिल कामे करत तर कोणाचे वडील मोलमजुरी करत होते. सर्व दररोज कामकरून पोट भरणाऱ्यांची ही मुल होती. मुलांशी संपर्क होत नसल्याने कुटूंबियांनी उत्तमनगर पोलिसांकडे त्यांची बेपत्ता झाल्याची खबर देखील दिली होती. यानंतर रायगड पोलिसांनी ताम्हीणी घाट परिसरात ड्रोनद्वारे पाहणी केली. तेव्हा गुरूवारी अपघात झाल्याची बाब समजली. ही घटना समोर आल्यानंतर मात्र, कोंढवे धावडे परिसरात प्रचंड शोककळा पसरली असून, पुर्ण परिसर शांतमय झाला आहे. कुटूंबिय, मित्र परिवार तसेच कोंढवे धावडेवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
सहा जणांनी एकत्रित व्यवसाय सुरू केल्यानंतर त्यातील दोघांनी कुटूंबियांचा विरोध असताना नवी-कोरी थार गाडी हप्त्याने घेतली. अवघे काहीच दिवस गाडी घेऊन झाले होते. नवीन गाडी घेतल्याने ते एकत्रित दिवे आगार येथे ट्रिपसाठी निघाले होते. १७ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास दिवे आगारला निघाले होते. परंतु, ताम्हीणी घाटात त्यांचा अपघात झाला व त्यांची कार खोल दरीत कोसळली. यात सहाही जणांचा मृत्यू झाला.