ठाकुर्ली स्थानकावर खळबळ! सिगारेट-बिडी ओढण्यास मनाई केल्याने प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यावर चाकूने हल्ला.

लगेज डब्यात सिगारेट-बिडी ओढण्यास मनाई करताच चाकूने वार! ठाकुर्ली रेल्वे स्थानकावर प्रवासी पदाधिकारी भरत टोपले जखमी, डोळा थोडक्यात बचावला; आरोपी फरार तर रात्रीच्या कसारा लोकलमधील उपद्रवावर कारवाईची मागणी
Railway Station Knife Attack
सौजन्य फोटो - नवराष्ट्र टिम Railway Station Knife Attack
Published on: 
Updated on: 

कल्याण: रेल्वेत प्रवासादरम्यान ठाकुर्ली रेल्वे स्थानकावर प्रवासी संघटनेचे पदाधिकारी भरत टोपले यांच्यावर आज सकाळी चाकूने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रेल्वेच्या लगेज डब्यात चढलेल्या काही तरुणांना सिगारेट व बिडी पिण्यास मनाई केली असता, संतप्त तरुणांनी भरत टोपले यांच्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यात त्यांच्या नाकाच्या बाजूला गंभीर दुखापत झाली असून, सुदैवाने त्यांचा डोळा बचावला आहे. त्यांच्या शर्टवर रक्ताचे डाग पडले होते. हल्ल्यानंतर दोन्ही आरोपी पुढील स्थानकावर उतरून फरार झाले.

Railway Station Knife Attack
माझ्याकडे पाहा, तू वाचणार आहेस... रिक्षाचालकांनीही नकार दिला अन् रुग्णवाहिकेशी संपर्क तुटला; मंदारच्या वकिलाची हतबलता समोर!

प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न

नोकरी-व्यवसायासाठी पहाटेच घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकर प्रवाशांवर अशा प्रकारे रेल्वे प्रवासादरम्यान हल्ले होत असतील, तर सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न किती गंभीर आहे, असा सवाल भरत टोपले यांनी उपस्थित केला आहे. टोपले हे कल्याण-कसारा रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी देखील असून, या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

संघटना आक्रमक; RPF व GRP आयुक्तांची भेट घेणार

या घटनेचा कल्याण-कसारा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनगाव आणि सरचिटणीस श्याम उबाळे यांनी तीव्र निषेध केला आहे. आरोपींचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच, प्रवासी संघटनेच्या प्रतिनिधीवरच हल्ला होत असेल, तर सामान्य प्रवाशांची सुरक्षा किती धोक्यात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात लवकरच मध्य रेल्वेचे पोलीस आयुक्त आणि RPF प्रमुख यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन देण्यात येणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Railway Station Knife Attack
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणात मोठा गौप्यस्फोट! ५० हजारांची सुपारी, मध्य प्रदेशातून पिस्तूल खरेदी अन् ८ आरोपी गजाआड

रात्रीच्या कसारा लोकलमध्ये जुगार, मद्यपान आणि गांजाचा वाढता उपद्रव!

दरम्यान, रात्रीच्या वेळी कसारा लोकलमध्येही अनेक गंभीर प्रकार सुरू असल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे. विशेषतः रात्री ११ ते १२ च्या सुमारास धावणाऱ्या कसारा लोकलमध्ये काही प्रवासी लगेज डब्यात घोळक्याने बसून खुलेआम तीन पत्तीचा जुगार खेळतात आणि मद्यपान करतात. तर काही गर्दुल्ले मागील लगेज डब्यात गांजा आणि सिगारेट ओढत असल्याचे प्रकार सर्रास घडत असल्याचे सांगण्यात येत आहे.

या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी RPF आणि GRP प्रशासनाने केवळ नियमित गस्त न घालता साध्या वेशात रेल्वे प्रवास करून प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करावी. तसेच संयुक्त कारवाई करून अशा समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कल्याण-कसारा रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.

Q

ठाकुर्ली रेल्वे स्थानकावर भरत टोपले यांच्यावर हल्ला का झाला?

A

रेल्वेच्या लगेज डब्यात चढलेल्या काही तरुणांना सिगारेट व विडी पिण्यास मनाई केल्याने संतप्त तरुणांनी भरत टोपले यांच्यावर चाकूने हल्ला केला.

Q

या हल्ल्यात भरत टोपले यांना कोणती दुखापत झाली?

A

या हल्ल्यात भरत टोपले यांच्या नाकाच्या बाजूला गंभीर दुखापत झाली असून, सुदैवाने त्यांचा डोळा बचावला आहे.

Q

कल्याण-कसारा रेल्वे प्रवासी संघटनेने कोणती मागणी केली आहे?

A

फरार आरोपींवर कठोर कारवाई करण्यासह रात्रीच्या कसारा लोकलमधील जुगार, मद्यपान व गांजाच्या उपद्रवावर RPF व GRP ने साध्या वेशात प्रवास करून संयुक्त कारवाई करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.