फोटो सौजन्य- प्रतिनिधी
वसई । रविंद्र माने: मोबाईल टाॅवरवर रेडीओ फ्रिक्वेनसीसाठी लावण्यात आलेल्या मशीन वजा ५ जी कार्ड ची चोरी करणा-या टोळीला अटक करुन २० गुन्हे उघडकिस आणण्याची कामगिरी गुन्हे प्रकटीकरण शाखा-३ ने केली आहे.नालासोपारा पुर्वेकडील फेन अव्हेन्यु इमारती वर असलेल्या एअरटेल टॉवरवर ५ जी नेटवर्कसाठी रेडीओ फ्रिक्वेन्सी कार्ड बसवण्यात आले होते.या कार्डची १४ सप्टेंबरला धाडसी चोरी करण्यात आली होती.याप्रकरणी आचोळे पोलीस ठाण्यात ३०५ (ए), ३(५), ३१७ (४) सह टेलीकम्युनिकेशन अॅक्ट कलम ४२ (१) (२) (३) (६), ४८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
चोरीच्या मशिन ते हाँगकाँग आणि चीन ला विकत
काही दिवसांपासून अशा चो-या सातत्याने होऊ लागल्या होत्या.त्यामुळे त्यांचा छडा लावण्याचे आदेश वरिष्ठांनी गुन्हे शाखा कक्ष-३ ला दिले होते. त्यानुसार तपास करताना कक्ष-३ च्या पथकाने घटनास्थळाचे तांत्रिक विश्लेषण करुन तसेच गोपनीय माहितीवरुन शुभम यादव रा. वाकोला,सांताक्रुज, शैलेश यादव रा.अंधेरी,कपुरचंद्र गुप्ता रा.एन्टाॅपहिल,बंन्सीलाल जैन रा.राणीबाग,मुंबई यांना मुंबईतून तर जाकीर सलीम मल्लीक आणि जैद अन्वर मलीक रा.मुस्तफाबाद,दिल्ली यांना दिल्लीतून तसेच जुनैद आरीफ मलिक रा.लोणी,गाझियाबाद याला उत्तरप्रदेश येथून ताब्यात घेण्यात आले.त्यांच्याकडून चाळीस लाख रुपये किंमतीचे मोबाईल टॉवरवर रेडीओ फ्रिक्वेन्सी साठी लावण्यात येणारे एकुण ३६ मशिन / कार्ड,मोबाईल,बाईक असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.चोरीच्या मशिन ते हाँगकाँग आणि चीन ला विकत असत,त्यांनी आतापर्यंत बिहार,झारखंड,पश्चिम बंगाल,पंजाब,गोवा राज्यातून चोरी केलेले कार्ड हस्तगत करण्यात आले आहेत.
आरोपींनी दिली गुन्ह्याची कबुली
या आरोपींनी मागील वर्षभरापासून मुंबई,ठाणे,नवी मुंबई,वसई-विरार-नालासोपारा परिसरात मोठ्या प्रमाणात या कार्डची चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून,वालीव-४,आचोळे-१,पेल्हार-४,विरार-३,मुंबई-४,ठाणे-६ आणि बिहारमधील एका गुन्ह्याची त्यांनी कबुली दिली आहे.वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख,सहायक पोलीस निरिक्षक सोपान पाटील,उपनिरीक्षक उमेश भागवत,सहायक फौजदार अशोक पाटील,हवालदार मनोज चव्हाण,सचिन घेरे,मुकेश तटकरे,सागर बारवकर,अश्विन पाटील,राकेश पवार,सुनिल पाटील,युवराज वाघमोडे,सुमित जाधव, मनोज तारडे,तुषार दळवी,आतिश पवार,प्रविण वानखेडे,गणेश यादव,सागर सोनवणे संतोष चव्हाण( सायबर सेल) यांनी ही कामगिरी केली.