अमरावती : औषध व्यावसायिक उमेश कोल्हे (Umesh Kolhe Murder) यांच्या हत्येने खळबळ उडाली होती. या हत्येचे कनेक्शन नुपूर शर्मा (Nupur Sharma) समर्थन पोस्टमध्ये असल्याने यात केंद्रातील प्रमुख तपास यंत्रणा एनआयए (NIA) यात अॅक्टीव्ह झाली आहे. आता पुढील तपासात उमेश कोल्हे यांच्या हत्येचा कट पशुवैद्य असणाऱ्या शेख इरफान शेख रहीम (Shaikh Irfan Shaikh Rahim) यानेच रचला असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या गटात सामील असणारा डॉक्टर युसुफ खान हा उमेश कोल्हे यांच्या अंत्ययात्रेतदेखील सहभागी होता.
पशूंच्या औषधांचे विक्रीचे दुकान उमेश कोल्हे हे अमरावती (Amravati) तहसील परिसरात चालवत होते. डॉक्टर युसुफ खान हा त्यांच्याकडून नियमित औषधे खरेदी करायचा. उमेश कोल्हे यांच्यासोबत त्याची बऱ्यापैकी ओळख झाल्यामुळे कोल्हे यांनी त्याला अनेकदा आर्थिक मदत केल्याचीही माहिती समोर आली. त्याच्याकडे उधारीची बरीच मोठी रक्कम थकीत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. असे असताना आपल्या व्यवसायाशी संबंधित असणाऱ्या व्हाॅट्सअॅप ग्रुपमध्ये उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनात दोन पोस्ट शेअर केल्या होत्या. डॉक्टर युनूफ खान याने उमेश कोल्हे यांनी शेअर केलेल्या पोस्टचे स्क्रीनशॉट काढून इतर ठिकाणी त्या शेअर केल्या होत्या.
संपूर्ण माहिती शेख इरफान शेख रशीदने दिली
शेख इरफान शेख रशीद याने उमेश कोल्हे यांच्या हत्येचा संपूर्ण कट रचला. या कटात शोएब खान, मुदलीस अहमद, आतिफ रशीद, अब्दुल तोफिक, शाहरुख पठाण आणि डॉक्टर युसुफ खान हादेखील सहभागी झाला. यानंतर उमेश कोल्हे हे आपले औषधीचे दुकान कधी उघडतात, कधी बंद करतात ते कोणत्या मार्गाने घरी जातात याची संपूर्ण माहिती शेख इरफान शेख रशीद यांनी काढली. यानंतर २१ जूनच्या रात्री साडेदहाच्या सुमारास उमेश कोल्हे हे औषधीचे दुकान बंद करून घरी जाण्यासाठी निघाले.
भररस्त्यात चिरला गळा
उमेश कोल्हे यांच्यासोबतच दुसऱ्या दुचाकीवर त्यांचा मुलगा आणि सून हेदेखील होते. श्याम चौक परिसरातील घंटी घड्याळलगत त्यांची दुचाकी अडवून त्यांचा गळा चिरण्यात आला. उमेश कोल्हे यांच्या दुचाकीच्या मागे काही अंतरावर असणारे त्यांचा मुलगा आणि सून हे घटनास्थळी पोहोचताच त्यांना उमेश कोल्हे हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. उमेश कोल्हे यांच्या मुलाने परिसरातील काही व्यक्तींच्या मदतीने खासगी रुग्णालयात त्यांना दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
शेख इरफान शेख रहीमच्या संघटनेला मदत?
नुपूर शर्मा यांचे समर्थन करणाऱ्यांना जीवे मारण्याबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावरचे काही कनेक्शन आहे का? याचा तपास आता सुरू झाला आहे. उदयपूर येथील टेलर कन्हैयालाल याची हत्यादेखील नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्यामुळेच घडली होती. यासह अमरावती शहरातील ज्या व्यक्तींनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनात पोस्ट शेअर केली. त्यांना त्वरित माफी मागावी, अशी धमकी मिळाली असल्यामुळे अनेकांनी माफीदेखील मागितली. शेख इरफान शेख रहीम हा एका संघटनेचा पदाधिकारी असल्याचे समोर आले असून, त्याच्या संस्थेला आंतरराष्ट्रीय स्तरावरून पैसा पुरवण्यात आला आहे का, याचा तपासदेखील केला जाणार आहे.