पदवी नाही, वैद्यकीय नोंदणीही नाही; तरीही रुग्णांवर उपचार सुरू! बोगस डॉक्टरला रंगेहात पकडले

हदगाव शहरात गोरगरीब रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांवर अखेर आरोग्य विभागाने हातोडा चालवला आहे. शहरात बिनधास्तपणे सुरू असलेल्या बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसायाचा आरोग्य विभागाने सापळा रचून पर्दाफाश केला आहे
हदगावात बोगस डॉक्टर रंगेहात पकडला
Crime News
Published on: 
Updated on: 

हदगाव : हदगाव शहरात गोरगरीब रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांवर अखेर आरोग्य विभागाने हातोडा चालवला आहे. शहरात बिनधास्तपणे सुरू असलेल्या बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसायाचा आरोग्य विभागाने सापळा रचून पर्दाफाश केला असून, एका बंगाली बोगस डॉक्टरविरुद्ध हदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शहरातील डॉ. टीकाकार यांच्या नागमाता दवाखान्यात एका बंगाली व्यक्तीकडून रुग्णांवर उपचार केले जात असल्याची ऑनलाइन तक्रार आरोग्य विभागाकडे प्राप्त झाली होती. तक्रार अत्यंत गंभीर असल्याने आरोग्य विभागाने तिची तात्काळ दखल घेतली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने नियोजनपूर्वक सापळा रचला. उप जिल्हा रुग्णालय हदगावचे अधीक्षक डॉ. प्रदीप स्वामी यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.

हदगावात बोगस डॉक्टरांविरुद्ध धडक मोहीम 

त्यानंतर पथकाने थेट दवाखान्यात धाड टाकून संबंधित व्यक्तीला प्रत्यक्ष उपचार करताना रंगेहात पकडले. या कारवाईवेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे, नर्सिंग माहूरकर, सतीश छत्रे, साळवे अस्वजित, किरवले संतोष आदी उपस्थित होते. संबंधित व्यक्तीविरुद्ध विविध कलमान्वये हदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धडक कारवाईमुळे शहरातील बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले आहेत. पदवी नसताना, नोंदणी नसताना, केवळ अनुभवाच्या जोरावर रुग्णांवर उपचार करणे म्हणजे थेट रुग्णांच्या जीवाशी खेळ आहे.

चुकीचे औषध, चुकीचे इंजेक्शन, चुकीचा सल्ला यामुळे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. अशा बोगस डॉक्टरांकडून उपचार करून घेणे नागरिकांच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते. त्यामुळे उपचार घेताना संबंधित डॉक्टरांची शैक्षणिक पात्रता व वैद्यकीय नोंदणी तपासूनच उपचार घ्यावेत. यापुढे असे बोगस डॉक्टर आपल्या परिसरात आढळून आल्यास आरोग्य विभागाकडे नागरिकांनी निर्भयपणे तक्रार दाखल करावी. आम्ही तक्रारीची तात्काळ दखल घेऊन संबंधित बोगस डॉक्टरविरुद्ध कठोरात कठोर कारवाई करू. 

- डॉ. संजय मुरमुरे, तालुका आरोग्य अधिकारी, हदगाव.

Q

हदगावमध्ये बोगस डॉक्टरविरुद्ध कारवाई का करण्यात आली?

A

शहरातील नागमाता दवाखान्यात एका बंगाली व्यक्तीकडून वैद्यकीय पात्रता आणि नोंदणी नसताना रुग्णांवर उपचार केले जात असल्याची ऑनलाइन तक्रार आरोग्य विभागाला मिळाली होती. त्यानंतर विभागाने सापळा रचून कारवाई केली.

Q

बोगस डॉक्टरला कुठे आणि कसे पकडण्यात आले?

A

हदगाव शहरातील डॉ. टीकाकार यांच्या नागमाता दवाखान्यात आरोग्य विभागाच्या पथकाने धाड टाकली. यावेळी संबंधित व्यक्ती रुग्णांवर उपचार करताना रंगेहात आढळली.

Q

या प्रकरणात कोणती कायदेशीर कारवाई करण्यात आली?

A

उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रदीप स्वामी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार संबंधित व्यक्तीविरुद्ध हदगाव पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.