सौजन्य - नवराष्ट्र टीम
पिंपरी : अमली पदार्थांच्या अवैध व्यापारातून कमावलेल्या पैशातून खरेदी केलेली तब्बल ५५ लाख १६ हजार रुपयांची स्थावर मालमत्ता पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गोठवली आहे. सांगवी पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यातील टोळीप्रमुख आणि त्याच्या पत्नीच्या नावावर असलेल्या या मालमत्तेवर NDPS Act मधील कलम 68F(1) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात २०२६ मधील अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५९६/२०२५ दाखल असून, या प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) लावण्यात आला आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी ५५.२९ ग्रॅम मेफेड्रोन (MD) जप्त केले होते. या प्रकरणातील टोळीप्रमुख जुनेद अफजल खान आणि त्याची पत्नी फौजिया सुलेमान साटी/खान यांच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्यात आली.
तपासादरम्यान पुरंदर तालुक्यातील गराडे येथील गट क्रमांक २२७४ मधील तीन गुंठे (३ हजार चौ.फूट) जमीन आणि त्यावरील बांधकाम, अशी सुमारे ५५ लाख १६ हजार रुपये किमतीची मालमत्ता त्यांच्या नावावर असल्याचे समोर आले. ही मालमत्ता अमली पदार्थांच्या अवैध व्यापारातून मिळालेल्या पैशातून खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
त्यानंतर सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-२ यांनी उपलब्ध पुराव्यांसह सक्षम प्राधिकारी, मुंबई यांच्याकडे मालमत्ता गोठविण्याचा प्रस्ताव सादर केला. सुनावणीदरम्यान संबंधितांनी ही मालमत्ता कायदेशीर उत्पन्नातून मिळवल्याचा ठोस पुरावा सादर केला नाही. त्यामुळे २ सप्टेंबर २०२६ रोजी सक्षम प्राधिकरणाने सदर मालमत्ता अमली पदार्थांच्या अवैध व्यापारातून मिळविल्याचे मान्य करत फ्रीझिंग आदेश कायम केला. आदेशानुसार सक्षम प्राधिकरणाच्या पूर्वपरवानगीशिवाय या मालमत्तेचे हस्तांतरण किंवा कोणताही व्यवहार करता येणार नाही.
अवैध संपत्तीवरही पोलिसांचा प्रहार
अमली पदार्थांची विक्री करून पैसा कमावणाऱ्यांविरोधात केवळ गुन्हे दाखल करून थांबणार नसून, त्या पैशातून उभारलेल्या आर्थिक साम्राज्यावरही कारवाई केली जाईल, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून पोलिसांनी दिला आहे. जमीन, घर, बांधकाम अथवा अन्य मालमत्ता अमली पदार्थांच्या पैशातून संपादित केल्याचे आढळल्यास कायद्यानुसार फ्रीझिंग, जप्तीची कारवाई केली जाणार आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, डॉ. बसवराज तेली, पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-२ सचिन कदम यांनी केली.






