Vaishnavi Hagavane Case: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पुणे पोलिसांची भूमिका आता संशयाच्या छायेत आली आहे. हगवणे कुटुंबाविरोधात त्यांच्या सुनांकडून वारंवार तक्रारी करण्यात आल्या होत्या, पण पोलिसांनी त्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या नाहीत. वैष्णवीच्या अर्भकाचे अपहरण झाल्यानंतरही पोलिसांनी दुर्लक्ष करत गंभीर निष्काळजीपणा केला. परिणामी, हगवणे कुटुंबातील काही संशयित व्यक्तींना अप्रत्यक्षपणे संरक्षण दिल्याचा आरोप पोलिसांवर ठेवला जात आहे. या पार्श्वभूमीवर, या प्रकरणात निष्क्रिय राहिलेल्या पोलिस अधिकाऱ्यांवर सरकार कोणती कारवाई करणार, हा प्रश्न आता समाजामध्ये विचारला जात आहे.
वैष्णवी हगवणे प्रकरणात तिचे सासरे राजेंद्र हगवणे यांना अटक करण्यात आली असून, त्यानंतर पुणे पोलिसांनी एक पत्रकार परिषद घेतली. मात्र ही पत्रकार परिषद अवघ्या १ मिनिट १० सेकंदांत संपवण्यात आली, ज्यामुळे एवढ्या गंभीर आणि संवेदनशील प्रकरणात अत्यल्प माहिती दिल्याबद्दल पुणे पोलिसांवर तीव्र टीका केली जात आहे. या प्रकरणात पोलिसांची भूमिका सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकलेली आहे. हगवणे कुटुंबीयांनी फक्त वैष्णवीचाच नव्हे, तर त्यांच्या मोठ्या सून मयुरी हगवणे हिचाही दीर्घकाळ छळ केला होता. नोव्हेंबर २०२४ मध्ये मयुरीने पौड पोलीस ठाण्यात मारहाणीची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असला तरी पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांनी कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही.
Todays Gold-Silver Price: सोन्या – चांदीच्या चढउतार कायम; काय आहेत आजचे भाव? जाणून घ्या
मयुरीवरील अत्याचारांपासून ते वैष्णवीच्या आत्महत्येपर्यंत प्रत्येक टप्प्यावर पुणे पोलिसांनी गंभीर दुर्लक्ष केल्याचे स्पष्टपणे दिसून येते. पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे वैष्णवीच्या अवघ्या नऊ महिन्यांच्या मुलाला सहा दिवस कठोर यातना सहन कराव्या लागल्या. वैष्णवी हगवणे आत्महत्येच्या प्रकरणात आता आणखी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. आत्महत्येनंतर राजेंद्र हगवणे औंध रुग्णालयात असल्याची माहिती असूनही, पोलिसांनी त्याला तातडीने ताब्यात घेतले नाही.
२० मे रोजी वैष्णवीच्या बाळाचा ताबा मिळवण्यासाठी तिच्या माहेरच्या कस्पटे कुटुंबीयांनी वारजे पोलीस ठाण्याकडे मदतीची मागणी केली होती. मात्र, हे प्रकरण आमच्या कार्यक्षेत्रात येत नाही, असे सांगत पोलीस निरीक्षक विश्वजीत कायंगडे यांनी तक्रार स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर बावधन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय विभुते यांनीही तक्रार नोंदवून घेतली नाही.
याप्रकरणी निलेश चव्हाणविरोधात अद्याप बाल अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. यापूर्वी निलेशच्या पत्नीने केलेल्या तक्रारीकडेही पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे तो अजूनही मोकाट फिरतो आहे. इतकंच नव्हे, तर निलेश चव्हाणच्या लॅपटॉपमध्ये सापडलेल्या अश्लील चित्रफितींमध्ये दिसणाऱ्या महिलांवर कोणतीही जबरदस्ती झाली आहे का, याचा तपासही अद्याप सुरू करण्यात आलेला नाही.
या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या कारवाईवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिस प्रशासन आणि सरकार हे केवळ प्रसंगानुसार आणि जनतेच्या दबावाखाली “ॲक्शन मोड” मध्ये जातात का, असा सवाल विचारला जात आहे. या प्रकरणात पोलिसांची भूमिका केवळ संशयास्पदच नव्हे, तर अतिशय हलगर्जी असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. “या प्रकरणात गुन्हेगारांना वाचवण्यात आले आणि महिला आयोगानेही दुर्लक्ष केलं,” असा थेट आरोप करत त्यांनी कारवाईची मागणी केली आहे.
IG जालिंदर सुपेकर (महिला सुरक्षा विभाग, पुणे विभाग)
– महिला अत्याचार व आत्महत्या प्रकरणांवर लक्ष ठेवणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या भूमिकेवरही संशय; महिला आयोगाशी समन्वय साधण्यात अपयश.
पीआय विश्वजीत कायंगडे (वारजे पोलीस स्टेशन)
– कस्पटे कुटुंबीयांकडून बाळाच्या ताब्यासाठी करण्यात आलेली तक्रार घेतली नाही. “हद्दीत येत नाही” असे सांगून जबाबदारी टाळल्याचा आरोप.
पीआय विजय विभुते (बावधन पोलीस स्टेशन)
– तक्रार असूनही स्वीकार न करणं आणि योग्य कारवाई न केल्यामुळे नाव चर्चेत.
पीआय संतोष गिरी गोसावी (पौड पोलीस स्टेशन)
– मयुरी हगवणेने नोव्हेंबर २०२४ मध्ये दिलेल्या मारहाणीच्या तक्रारीवर कारवाई न केल्यामुळे गंभीर आरोप.
पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड
– संपूर्ण प्रकरणातील पोलीस यंत्रणेच्या निष्क्रियतेबाबत प्रश्न उपस्थित होत असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांची जबाबदारी ठरते.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे
– पोलिसांच्या कारवाईतील सुसूत्रता आणि उत्तरदायित्वावर प्रश्नचिन्ह. पत्रकार परिषदेमध्ये उथळ भूमिका घेतल्याचा आरोप.