कार वळवण्याच्या वादातून तरुणाचा खून; आठ दोषींना न्यायालयाने सुनावली 'ही' मोठी शिक्षा

कार वळवण्याच्या किरकोळ वादातून २७ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून करून त्याच्या आई व भावाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी वडगाव मावळ सत्र न्यायालयाने आठ दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
murder case
murder casemaval murder news
Published on: 
Updated on: 
  • आठ दोषींना जन्मठेपेची शिक्षा

  • प्रत्येकी १० हजारांचा दंड ठोठावला

  • नववा आरोपी अद्याप फरार

पुणे : कार वळवण्याच्या किरकोळ वादातून २७ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून करून त्याच्या आई व भावाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी वडगाव मावळ सत्र न्यायालयाने आठ दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. के. अनभुले यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. तसेच प्रत्येक दोषीला १० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला असून, दंडाची रक्कम फिर्यादीला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

सुनील शंकरराव शिंदे (वय ४२), सतीश शंकरराव शिंदे (वय ३८), बबन दगडू शिंदे (वय ५३), बाळू मारुती गोसावी (वय ४८), ऋषिकेश सुरेश शिंदे (वय ३३), दगडू ऊर्फ सुभाष अशोक खांडभोर (वय ३२), शंकरराव अनंतराव शिंदे (वय ७२) आणि पंकज बाळू खांडभोर (वय ३५) अशी शिक्षा झालेल्या दोषींची नावे आहेत. तर या प्रकरणातील नववा आरोपी सुरेश रामभाऊ देशमुख अद्याप फरार आहे.

ही घटना १९ जानेवारी २०२१ रोजी मावळ तालुक्यातील जांभूळ येथे घडली होती. कार वळवण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून आरोपींनी फिर्यादी महिला आणि तिच्या मुलांना मारहाण केली होती. याबाबत तक्रार देण्यासाठी जात असताना जांभूळ रेल्वे क्रॉसिंगजवळ आरोपींनी त्यांची गाडी अडवली. कोयता आणि लाकडी दांडक्यांनी कारच्या काचा फोडून शुभम व प्रशांत या दोघांना बाहेर ओढले आणि त्यांच्या डोक्यावर गंभीर वार केले. या हल्ल्यात जखमी झालेल्या शुभमवर पवना रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, ३७ दिवसांच्या उपचारानंतर गंभीर दुखापतीमुळे त्याचा मृत्यू झाला.

या खटल्यात विशेष सरकारी वकील पी. एस. सप्रे यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडली. त्यांनी १२ साक्षीदार तपासले. पहिल्या मारहाणीनंतर आरोपी शस्त्रे आणि साथीदार घेऊन पुन्हा आले होते. त्यामुळे हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचे न्यायालयाने नमूद केले. बचाव पक्षाचा युक्तिवाद फेटाळून न्यायालयाने आठही दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

Q

या खून प्रकरणात किती जणांना जन्मठेपेची शिक्षा झाली?

A

वडगाव मावळ सत्र न्यायालयाने आठ दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

Q

तरुणाचा खून कोणत्या कारणावरून झाला होता?

A

कार वळवण्याच्या किरकोळ वादातून आरोपींनी तरुणावर कोयता आणि लाकडी दांडक्यांनी हल्ला केला होता.

Q

या प्रकरणातील नवव्या आरोपीचे काय झाले?

A

नववा आरोपी सुरेश रामभाऊ देशमुख हा अद्याप फरार आहे.